Home Loan Rule : शहरात राहणाऱ्या प्रत्येकाचे आपल्या हक्काचं घर असावं असं स्वप्न असते. त्यामुळे स्वतःच्या घरासाठी गृह कर्ज घेणे अनेक जण 'हुशारीचा निर्णय' मानतात. पण, तज्ज्ञांच्या मते, हा एक मोठा 'आर्थिक सापळा' ठरू शकतो, ज्यामुळे तुम्हाला मूळ किमतीपेक्षा लाखो रुपये अधिक भरावे लागतात. चार्टर्ड अकाउंटंट नितिन कौशिक यांनी X (ट्विटर) वर गृह कर्ज व्यवस्थापनावर सविस्तर माहिती देत, ५० लाख रुपयांच्या कर्जावर ३६ लाखांची बचत कशी करायची, हे सोप्या आकडेवारीसह स्पष्ट केले आहे.
कौशिक यांच्या मते, ८.५% व्याजदरावर ३० वर्षांसाठी घेतलेले ५० लाखांचे कर्ज म्हणजे बँकेला एकूण १.४ कोटी रुपये परत करणे. कर्ज मंजूर झाल्यावर आनंद साजरा करणे म्हणजे केवळ मोठी जबाबदारी स्वीकारणे होय.
कर्जदार 'या' ४ मोठ्या चुका करतात
१. केवळ EMI वर लक्ष केंद्रित करणे
२० वर्षांच्या कर्जावर मासिक हप्ता सुमारे ४३,४०० रुपये असतो आणि एकूण व्याज ५४ लाख रुपये भरावे लागते.
जर तुम्ही कर्जाचा कालावधी ३० वर्षांपर्यंत वाढवला, तर EMI ३८,६०० रुपयांपर्यंत कमी होतो, पण एकूण व्याज ८८ लाख रुपये होते! म्हणजेच, दरमहा ४,८०० रुपये वाचवण्याच्या नादात तुम्ही बँकेला ३४ लाख रुपये अतिरिक्त द्यावे लागतात.
२. 'फ्लोटिंग-रेट' कडे दुर्लक्ष
RBI ने व्याजदरात कपात केली तरी, अनेक कर्जदारांना त्याचा त्वरित फायदा मिळत नाही. कर्जदारांनी त्यांच्या RLLR-संबंधित कर्जावर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे आणि बँकेकडून त्वरित कपातीचा लाभ मिळवला पाहिजे.
३. EMI रचना चुकीची समजणे
अनेकांना वाटते की EMI मध्ये मूळ रक्कम आणि व्याज समान प्रमाणात विभागले जाते. मात्र, कर्जाच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये ७०-८०% रक्कम व्याजामध्ये जमा होते.
४. EMI कमी करण्यासाठी कालावधी वाढवणे
कालावधी वाढवल्याने तात्पुरता कॅश फ्लो सोपा होतो, पण दीर्घकाळात व्याजाचा खर्च प्रचंड वाढतो. त्याऐवजी, कौशिक यांनी कर्जाचा कालावधी न बदलता मासिक हप्ता थोडा वाढवण्याचा सल्ला दिला.
गृह कर्जातून वाचवा ३६ लाख रुपये
गृह कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी सीए कौशिक यांनी हे ५ सोपे आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत.
- दरवर्षी एक अतिरिक्त EMI भरा. यामुळे तुम्ही ११.५ लाख रुपये व्याज वाचवू शकता आणि ५० लाखांचे कर्ज ५ वर्षे आधी फेडू शकता.
- EMI मध्ये दरवर्षी वाढ. तुमच्या पगारातील वाढीनुसार EMI मध्ये दरवर्षी १०% वाढ केल्यास, ३० वर्षांचे कर्ज १० वर्षांत फेडले जाईल आणि ३६ लाखांहून अधिक बचत होईल.
- कर लाभांचा योग्य वापर. जुन्या कर प्रणालीनुसार, कर्जदार मूळ रकमेवर (८० सी) ₹१.५ लाख आणि व्याजावर (२४ बी) २ लाखांची कपात घेऊ शकतात. सह-कर्जदार हे लाभ दुप्पट करू शकतात.
- सुरुवातीला लवकर prepayment करा. कर्जाच्या पहिल्या ५ ते ७ वर्षांमध्ये प्रीपेमेंट केल्यास सर्वाधिक फायदा होतो, कारण या काळात सर्वाधिक व्याज आकारले जाते.
- शिल्लक हस्तांतरण. जर तुमच्या कर्जाचा दर ८.८% असेल आणि नवीन कर्ज ७.५% वर उपलब्ध असेल, तर बॅलन्स ट्रान्सफर केल्यास अनेक लाख रुपयांची बचत होऊ शकते.
RBI च्या कपातीचा फायदा
या वर्षी RBI ने रेपो रेटमध्ये सलग १०० बेसिस पॉइंटची कपात केल्यामुळे कर्जदारांना दिलासा मिळाला आहे. १०० बेसिस पॉइंटच्या कपातीमुळे ५० लाखांच्या कर्जावर (२० वर्षांसाठी) दरमहा ३,२५० रुपयांची बचत होते.
🏡 Buying a house is emotional. But a home loan is the biggest financial trap many fall into without realizing it.
— CA Nitin Kaushik (FCA) | LLB (@Finance_Bareek) October 8, 2025
Here’s how to avoid paying 2–3x your loan and hacks to repay faster. 👇 🧵#stockmarketscrash#finance#realestate#investingtipspic.twitter.com/qAr6KVn6IJ
सीए कौशिक यांच्या मते गृह कर्ज ३० वर्षांचा सापळा असू शकतो. सांगितलेल्या स्मार्ट पद्धतींचा अवलंब केल्यास, ५० लाखांचे कर्ज १० वर्षांच्या स्मार्ट लोनमध्ये रूपांतरित होऊन ३६ लाख रुपये वाचू शकतात.