Home Loan : 'नोकरी मिळाली, आता भाड्याने का राहायचे? आता घरच विकत घेऊया!' अशी मानसिकता मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये खूप सामान्य आहे. गृहकर्ज सहज उपलब्ध होत असल्याने घर खरेदी करणे सोपे झाले आहे. मात्र, आयुष्यभर कर्ज फेडण्याच्या तणावाखाली राहायचे की भाड्याने राहून बचत करायची, हा मोठा प्रश्न आहे. प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्ती आयुष्यात एक किंवा दोनदा घर घेतो. पण, हा निर्णय फक्त तुमच्या पगारावर अवलंबून नसतो. घर कधी विकत घ्यावे? याबद्दल तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं आहे.१. तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा?
घर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यासाठी दोन महत्त्वाचे निकष आहेत, घराची किंमत आणि तुमचा पगार.
गृहकर्जाचा मासिक हप्ता तुमच्या मासिक पगाराच्या जास्तीत जास्त २० ते २५ टक्के असावा. जर तुमचा मासिक पगार १ लाख रुपये असेल, तर तुम्ही दर महिन्याला २५,००० रुपयांचा EMI सहज भरू शकता. जर पगार ५० हजार ते ७० हजार रुपये असेल आणि तुम्ही २५,००० रुपयांचा ईएमआय असलेले घर घेतले, तर आर्थिकदृष्ट्या हा निर्णय अयोग्य मानला जातो.
| मासिक पगार (अंदाजित) | योग्य EMI मर्यादा (जास्तीत जास्त २५%) | योग्य घराचे बजेट (अंदाजित) |
| १ लाख रुपये | २५,००० | रुपये ३० ते ३५ लाख रुपये |
| १.५ लाख रुपये | ३७,५०० रुपये | ५० लाख आणि त्याहून अधिक |
(टीप: ही आकडेवारी २० वर्षांच्या कर्ज कालावधीनुसार अंदाजित आहे.)
२. जॉब प्रोफाइल आणि करिअरचा विचार महत्त्वाचा
घर खरेदी करण्यापूर्वी तुमचे जॉब प्रोफाइल काय आहे आणि तुमच्या करिअरची दिशा काय असेल, याचा विचार करा.
जर तुम्ही नोकरी लागताच घर घेतले, तर तुम्ही एका शहरापुरते बांधले जाता. करिअरमध्ये ग्रोथसाठी अनेकदा शहर बदलावे लागते. अशा वेळी आपले घर भाड्याने देणे आणि नवीन शहरात भाड्याने राहणे, हे अनेकांना सोयीचे वाटत नाही. जर तुमची नोकरी सुरक्षित नसेल, तर घाईघाईत घर खरेदी करू नका. नोकरी गमावल्यास ईएमआय फेडणे डोकेदुखी ठरू शकते.
३. भाड्याने कधीपर्यंत राहायचे?
भाड्याने कधीपर्यंत राहायचे आणि घर कधी खरेदी करावे, याचे सोपे उत्तर आहे, जेव्हा तुम्ही एका शहरात स्थायिक होण्याचा निर्णय घ्याल, तेव्हा. तुमची नोकरी स्थिर असावी आणि घराचा ईएमआय तुमच्या एकूण उत्पन्नाच्या २०% पेक्षा जास्त नसावा. यामुळे तुमच्या गुंतवणुकीवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. या सर्व लक्ष्यांपर्यंत पोहोचायला नोकरीची १० वर्षे जरी लागली, तरी तोपर्यंत भाड्याने राहणे अधिक श्रेयस्कर आहे. भाड्याने राहून तुम्ही नोकरी किंवा शहर बदलण्याची लवचिकता ठेवता. शिवाय, भाड्यापोटी वाचणारे पैसे तुम्ही चांगल्या ठिकाणी गुंतवून उत्तम परतावा मिळवू शकता.
४. घर कुठे खरेदी करावे?
जर तुम्ही घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला असेल, तर अशी प्रॉपर्टी निवडा जिथे चांगले भाडे मिळते. फ्लॅटच्या किंमतीत वार्षिक किमान ८ ते १० टक्के वाढ व्हावी. तुमचे गृहकर्ज जेव्हा पूर्ण (२० वर्षांनी) होईल, तेव्हा फ्लॅटची किंमत तुम्ही खरेदी केलेल्या किमतीच्या किमान तिप्पट असावी.
वाचा - रिलायन्स पॉवरला मोठा झटका! बनावट बँक गॅरंटी प्रकरणी ED कडून तिसरी अटक; माजी CFO चाही समावेश
पहिली नोकरी लागताच घर आणि गाडी घेऊन ईएमआयचा मोठा बोजा अंगावर ओढून घेणे आर्थिकदृष्ट्या चुकीचे ठरू शकते. गरजेनुसार निर्णय घ्या. कमाईला आधार न बनवता, बचतीला महत्त्व देऊन निर्णय घ्या. नोकरीच्या सुरुवातीलाच बचत सुरू केल्यास तुम्ही ४० व्या वर्षी निवृत्तीबद्दल आश्वस्त व्हाल.
