Ather Energy IPO: इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी एथर एनर्जीही (Ather Energy) शेअर बाजारात (Share Market) उतरणार आहे. यासाठी कंपनी २८ एप्रिल रोजी आपला लाँच करणार आहे. कंपनीनं प्रति शेअर ३०४ ते ३२१ रुपये असा प्राइस बँड निश्चित केलाय. हा आयपीओ २८ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत खुला राहणार आहे. अँकर इन्व्हेस्टर्ससाठी हा आयपीओ एक ट्रेडिंग डे आधी म्हणजेच २५ एप्रिलला खुला होईल. चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये येणारा हा पहिला मोठा आयपीओ असेल.
या शेअर्सच्या वाटपाची तारीख २ मे २०२५ असेल. ६ मे २०२५ रोजी कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होतील. टायगर ग्लोबलसह अनेक मोठ्या गुंतवणूक कंपन्यांनी एथर एनर्जीमध्ये गुंतवणूक केली आहे. शेअर बाजारात सुरू असलेली अस्थिरता लक्षात घेता एथर एनर्जीनं आपल्या आयपीओची साईज कमी केली आहे. कंपनी आपल्या आयपीओद्वारे २,६२६ कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करेल. यापूर्वी हे मूल्य ३,१०० कोटी रुपये होतं.
याव्यतिरिक्त, आयपीओमध्ये १.१ कोटी समभागांच्या ऑफर फॉर सेलचा (OFS) देखील समावेश आहे, ज्यात प्रवर्तक समूह आणि काही संस्थात्मक गुंतवणूकदार आपला हिस्सा विकतील. ओएफएसअंतर्गत प्रवर्तक तरुण मेहता आणि स्वप्नील बबनाला यांच्यासह काही कॉर्पोरेट भागधारक आपला हिस्सा विकणार आहेत.
कुठे होणार निधीचा वापर?
एथर एनर्जीनं दिलेल्या माहितीनुसार, आयपीओद्वारे जमा झालेल्या रकमेचा वापर कंपनी महाराष्ट्रात नवीन प्रकल्प उभारणं, संशोधन आणि विकास, कर्जाची परतफेड, मार्केटिंग आणि इतर सामान्य कॉर्पोरेट गरजा पूर्ण करण्यासाठी करणार आहे.
हीरो मोटोकॉर्पचा मोठा हिस्सा
एथरचा सर्वात मोठा भागधारक हीरो मोटोकॉर्प (Hero Motocorp) आहे, ज्याचा कंपनीत सुमारे ४०% हिस्सा आहे. हीरोने या पब्लिक ऑफरमध्ये आपला हिस्सा विकणार नसल्याचं स्पष्ट केलंय.
कंपनीबद्दल माहिती
एथर एनर्जी ही देशातील आघाडीची इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी आहे, जी इलेक्ट्रिक स्कूटर, बॅटरी पॅक, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याच्याशी संबंधित सॉफ्टवेअर सिस्टम डिझाइन, उत्पादन आणि असेंबल करते. त्यांच्या मुख्य प्रोडक्ट लाइनमध्ये हे एथर ४५० आणि अथर रिज्ता यांचा समावेश आहे. या दोन्हींचे एकूण ७ व्हेरियंट आहेत.
बंगळुरूस्थित कंपनीनं आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या नऊ महिन्यांत आपला तोटा ५७८ कोटी रुपयांवर आणला आहे, जो गेल्या वर्षी याच कालावधीत ७७६ कोटी रुपये होता. ही सुधारणा प्रामुख्यानं २०२४ मध्ये लाँच झालेल्या अथर रिज्ताच्या वाढीव विक्रीमुळे झाली आहे. ओला इलेक्ट्रिकनंतर शेअर बाजारात लिस्ट होणारी ही भारतातील दुसरी प्युअर इलेक्ट्रिक वाहन कंपनी ठरणार आहे.
(टीप - यामध्ये केवळ आयपीओ संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा किंवा जाणकारांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)