Vedanta Anil Agarwal News: अब्जाधीश उद्योगपती अनिल अग्रवाल यांच्या वेदांता लिमिटेडनं २०२४-२५ या आर्थिक वर्षात केंद्र आणि अनेक राज्यांमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला (BJP) ९७ कोटी रुपयांची देणगी दिली. ही रक्कम २०२३-२४ या आर्थिक वर्षापेक्षा चार पट जास्त आहे. कंपनीच्या ताज्या वार्षिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे. कंपनीनं आर्थिक वर्षात (२०२४-२५) एकूण १५७ कोटी रुपयांची राजकीय देणगी दिली, जी मागील आर्थिक वर्षात ९७ कोटी रुपये होती. अहवालानुसार, भाजपला देण्यात येणारी देणगी चार पट वाढली परंतु मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसला देण्यात येणारी देणगी घसरुन केवळ १० कोटी रुपयांपर्यंत आली.
कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार वेदांतानं २०२३-२४ या आर्थिक वर्षात भाजपला २६ कोटी रुपयांची देणगी दिली. २०१७-१८ मध्ये कंपनीने बिजू जनता दलाला २५ कोटी रुपये, झारखंड मुक्ती मोर्चाला २० कोटी रुपये (मागील आर्थिक वर्षात ५ कोटी रुपये) आणि काँग्रेसला १० कोटी रुपये (गेल्या आर्थिक वर्षात ४९ कोटी रुपये) दिले होते. वेदांता ही राजकीय पक्षांना सर्वात मोठी देणगी देणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे.
नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
४५७ कोटींची देणगी
वेदांतानं २०२२-२३ या आर्थिक वर्षात राजकीय पक्षांना एकूण १५५ कोटी रुपये आणि २०२१-२२ मध्ये १२३ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. मात्र, या आर्थिक वर्षांसाठी देणग्या मिळालेल्या राजकीय पक्षांचा तपशील जाहीर करण्यात आलेला नाही. कंपनीने २०१७ पासून इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून (आता रद्द) राजकीय पक्षांना ४५७ कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
इलेक्टोरल बॉण्डमुळे कंपन्या आणि व्यक्तींना त्यांची ओळख उघड न करता राजकीय पक्षांना देणगी देण्याची परवानगी होती. सर्वोच्च न्यायालयानं गेल्या वर्षी इलेक्टोरल बॉण्ड्सवर बंदी घातली होती आणि त्यांना असंवैधानिक ठरवलं होतं. वेदांताचा जनहित निवडणूक ट्रस्ट हा राजकीय पक्षांना देणगी देण्यासाठी कंपन्यांनी स्थापन केलेल्या डझनभराहून अधिक निवडणूक ट्रस्टपैकी एक आहे. असाच एक ट्रस्ट म्हणजे टाटा यांचा प्रोग्रेसिव्ह इलेक्टोरल ट्रस्टही आहे.
निरनिराळ्या कंपन्यांचे ट्रस्ट
कंपन्यांनी स्थापन केलेल्या इतर समान ट्रस्टमध्ये रिलायन्सचे पीपल्स इलेक्टोरल ट्रस्ट, भारती ग्रुपचे सत्या इलेक्टोरल ट्रस्ट, एमपी बिर्ला ग्रुपचे परिवर्तन इलेक्टोरल ट्रस्ट आणि के के बिर्ला ग्रुपच्या समाज इलेक्टोरल ट्रस्ट असोसिएशन यांचा समावेश आहे. बजाज आणि महिंद्रा यांचेही असेच इलेक्टोरल ट्रस्ट आहेत.