vidhan sabha 2019 : बुलडाणा जिल्ह्यात सातही ठिकाणी चुरशीच्या लढती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 02:22 PM2019-09-22T14:22:01+5:302019-09-22T14:23:14+5:30

बुलडाणा विधानसभा मतदारसंघ भाजप लोकसभेच्या जागेच्या बदल्यात मागत असल्याने जिल्ह्यात युतीबाबत काहीशी संभ्रमावस्था आहे.

Bulldana District: Fighting in all seven places! | vidhan sabha 2019 : बुलडाणा जिल्ह्यात सातही ठिकाणी चुरशीच्या लढती!

vidhan sabha 2019 : बुलडाणा जिल्ह्यात सातही ठिकाणी चुरशीच्या लढती!

Next

- नीलेश जोशी  
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : युतीच्या जागा वाटपा बाबत अद्याप निश्चिती झाली नसली तरी बुलडाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात युती विरुद्ध आघाडी अश्याच चुरशीच्या लढती होण्याचे संकेत आहेत. त्यातच युतीमध्ये बुलडाणा विधानसभा मतदारसंघ भाजप लोकसभेच्या जागेच्या बदल्यात मागत असल्याने जिल्ह्यात युतीबाबत काहीशी संभ्रमावस्था आहे.
पारंपारिक पद्धतीने बुलडाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघामध्ये युती विरुद्ध आघाडी अशा लढती होणार असल्याचे संकेत आहे. वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर कोणती समिकरणे बिघडवतो यावर बरीचशी गणिते अवलंबून आहेत. मलकापूर विधानसभा मतदारसंघात सहाव्यांदा चैनसुख संचेती भाजपकडून भाग्य आजमावत आहे तर काँग्रेसचा येथील उमेदवार अद्याप निश्चित नाही. जळगाव जामोदमध्ये औट घटकेसाठी कामगारमंत्री बनलेले डॉ. संजय कुटे हे चौथ्यांदा रिंगणात उतरत आहेत. सामाजिक समिकरणे पाहता काँग्रेसकडून येथे त्यांच्याविरोधात तगडा उमेदवार दिल्या जाण्याची शक्यता आहे. नाही म्हणायला डॉ. कुटे यांचा गेल्या वेळी सुमारे साडेचार हजार मतांच्या फरकांनी विजय झाला होता. त्यामुळे त्यांच्यासाठी यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. खामगावात आकाश फुंडकर यांना विजयाची परंपरा कायम राखण्यासाठी यंदा झगडावे लागणार आहे. गेल्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोंदीची सभा त्यांना तारून गेली होती. येथे वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टरही प्रसंगी निर्णायक भूमिका वठवू शकतो. काँग्रेसचे माजी आ. दिलीपकुमार सानंदा हे येथून इच्छूक उमेदवार आहे. मध्यंतरी त्यांनी वंचितच्या सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचीही भेट घेतली होती. दुसरीकडे बुलडाणा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार हर्षवर्धन सपकाळ यांच्या रुपाने तयार असला तरी युतीत ही जागा भाजपला मिळते की शिवसेना ती आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी होते यावर येथील लढतीची गणिते अवलंबून आहे. काँग्रेसच्या येथील एक इच्छूक वंचितच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे.सर्वाधिक चर्चेत असलेले चिखलीचे काँग्रेसचे आ. राहूल बोंद्रे यांची येत्या काळातील भूमिका नेमकी काय राहते याकडे लक्ष लागून आहे. येथे भाजपकडून डझनभर इच्छूक आहेत. सिंदखेड राजामध्ये राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे विरुद्ध शिवसेनेचे डॉ. शशिकांत खेडेकर अशी सरळ लढत राहणार आहे. मेहकरमध्ये डॉ. संजय रायमुलकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होईल. पण रायमुलकर यांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा त्यांना अडचणीचा ठरू शकतो. राष्ट्रवादीचा उमेदवार येथे अद्याप निश्चित नाही.


पालकमंत्र्यांचीही प्रतिष्ठा पणाला
कामगारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांचीही प्रतिष्ठा यंदा पणाला लागली आहे. सलग तीन वेळा त्यांनी जळगाव जामोद मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. गेल्या वेळी अवघ्या चार हजार ९६५ मतांनी ते विजयी झाले होते. त्यांच्या विरोधात प्रसेनजीत पाटील यांनी भक्कमपणे लढत दिली होती. यंदा येथील लढतीचे चित्र कसे असले ते अद्याप स्पष्ट नसले तरी प्रसेनजीत पाटील, स्वाती वाकेकर यांच्या रुपाने त्यांना येथे पुन्हा तगडा प्रतिस्पर्धी सामाजिक समिकरणाच्या आधारावर दिल्या जाऊ शकतो.


मातृतिर्थ सिंदखेडराजा मतदारसंघावर लक्ष
लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पुन्हा एकदा सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातून आपले भविष्य आजमावत आहेत. गतवेळी त्यांनी निवडणूक लढवली नव्हती. त्यामुळे येथे होणारी लढत ही चुरशीची व शिवसेनेचे त्यांचे प्रतिस्पर्धी यांच्यासाठी प्रतिष्ठेची राहणार आहे. उभयंतांचे राजकीय भवितव्य या निवडणुकीवर ठरणार आहे. त्यामुळे डॉ. शिंगणे यांनी आपल्या ३० वर्षाच्या राजकारणाचा अनुभव गाठीशी बांधत येथे काम सुरू केले आहे. त्यामुळे येथील निकालाबाबत उत्सूकता राहणार आहे.


खामगावमध्येही उत्सूकता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गेल्या विधानसभा निवडणुकीत खामगाव येथे सभा झाली होती. त्या पृष्ठभूमीवर यंदाही येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होते का? याबाबत उत्सूकता असून भाजपचे नवखे अ‍ॅड. आकाश फुंडकर यांना येथे आपली पत राखण्यासाठी मोठा जोर लावावा लागण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.


‘वंचित’ फॅक्टर
वंचितमुळे लोकसभा निवडणुकीत आघाडीला फटका बसला तसा युतीलाही तो तब्बल चार टक्क्यांनी बसला आहे. परिणामी विधानसभा निवडणुकीत वंचित फॅक्टर जिल्ह्यातील कोणती समिकरणे बदलवतो याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागून आहे. काही इच्छूक हे वंचितच्याही संपर्कात असल्याचे सांगितले जाते.

Web Title: Bulldana District: Fighting in all seven places!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.