Join us

गाडी नव्हती तयार, मग सैफला कसं नेलं दवाखान्यात? घरापासून 2 KM अंतरावर आहे रुग्णालय; वाचा नेमकं काय काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 15:36 IST

उपचारासंदर्भात डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, "रात्री २ वाजताच्या सुमारास सैफ अली खानला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले...

बॉलीवुड अभिनेता सैफ अली खानवर एक अज्ञात व्यक्तीने चाकू हल्ला केल्याची घटना घडली. संबंधित व्यक्तीने सैफवर एक-दोन नव्हे तर तब्बल 6 वेळा चाकूने वार केले. मुंबईतील वांद्रे परिसरात बुधवारी मध्यरात्री ही खळबळजनक घटना घडली. समोर आलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर सैफचा मोठा मुलगा इब्राहिमने त्याला तत्काळ लिलावती रुग्णालयात नेले. घरापासून रुग्णालयाचे अंतर दोन किलोमिट आहे. महत्वाचे म्हणजे, ही घटना एवढी अनपेक्षितपणे घडली की, घटनास्थळी कोणती गाडीही उपलब्ध होऊ शकली नाही, असे सांगण्यात येत आहे.

ऑटोमध्ये बसून नेलं रुग्णालयात -माध्यमांतील वृत्तांनुसार, इब्राहिमने सैफला ऑटोमध्ये बसवून रुग्णालयात नेले. दरम्यान, अगदी याच वेळचा घराबाहेरील एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सैफची पत्नी करीना खानही ऑटो जवळ उभी असल्याचे आणि घरातील स्टाफसोबत बोलताना दिसत आहे. 

शस्त्रक्रिया यशस्वी -उपचारासंदर्भात डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, "रात्री २ वाजताच्या सुमारास सैफ अली खानला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. चाकूच्या तुकड्यामुळे त्याच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. हा तुकडा बाहेर काढण्यासाठी सर्जरी करावी लागली. त्याच्या डाव्या हाताला दोन गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यांच्या मानेवरही जखम झाली होती. त्यासाठी प्लास्टिक सर्जरी करावी लागली. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. यामुळे काळजीचे कारण नाही."

काय म्हणतायत पोलीस? -अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात मुंबई पोलिस उपायुक्त दीक्षित गेदाम यांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे. "अभिनेता सैफ अली खानच्या घरी जी घटना घडली, त्याबाबत केलेल्या प्राथमिक तपासात आम्हाला असे आढळून आले की, हल्लेखोर इमारतीच्या पायऱ्यांचा वापर करून वरती गेला आणि फायर एक्झिटमधून घरात शिरला. याबाबत संशयित हल्लेखोराची माहिती आम्ही काढली आहेत. या हल्लेखोराच्या शोधासाठी १० पथके मुंबईतील विविध भागात पाठवण्यात आली आहेत. या प्रकरणातील हल्लेखोराला अटक केल्यानंतर बाकी सगळी माहिती देता येईल. परंतु, प्रथमदर्शनी तपासात हा हल्लेखोर चोरी करण्याच्या उद्देशानेच घरात शिरला होता, असे समोर आले आहे."

टॅग्स :सैफ अली खान करिना कपूरडॉक्टरपोलिसहॉस्पिटलचोरचोरी