Join us

स्वरा भास्कर काँग्रेसकडून निवडणूक लढवणार? मुंबईतील या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 16:29 IST

Lok Sabha Election 2024: विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर परखड भाष्य करणारी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) हिला काँग्रेसकडून (Congress) उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून जागावाटपाला अद्याप अंतिम रूप देण्यात आलेले नाही. मात्र मविआमधील घटक पक्षांकडून आपल्या वाट्याला येणाऱ्या मतदारसंघांमध्ये उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. काँग्रेसने कालच महाराष्ट्रातील  ७ उमेदवारांची नावं जाहीर केली होती. दरम्यान, विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर परखड भाष्य करणारी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिला काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मुंबईतील उत्तर-मध्य मतदारसंघामधून काँग्रेसकडून स्वरा भास्कर हिच्या नावाची चाचपणी सुरू आहे. स्वरा भास्करबरोबरच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज बब्बर यांच्या नावाचा विचारही काँग्रेसकडून सुरू आहे.

महाविकास आघाडीमधील जागावाटपात काँग्रेसला मुंबईतील केवळ एक जागा मिळण्याची शक्यता आहे. मुंबईतील मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघ काँग्रेसला मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. इथून उमेदवारीसाठी स्वरा भास्करचं नाव आघाडीवर आहे. स्वरा भास्कर हिने दिल्लीमध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांची भेट घेतल्याचीही माहिती समोर येत आहे. स्वरा भास्करप्रमाणेच काँग्रेसकडून राज बब्बर यांच्या नावाचीही चाचपणीही सुरू आहे. मात्र मतदारसंघातील तरुण मतदारांचा विचार करता स्वरा भास्करच्या नावाला झुकतं माप मिळण्याची शक्यता आहे. 

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात भाजपाच्या पूनम महाजन ह्या विद्यमान खासदार आहे. त्यांनी मागच्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा पराभव केला होता. मात्र शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे येथील समिकरणं बदलली आहेत. सद्यस्थिती या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी दोन मतदारसंघात भाजपाचे दोन मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. तर काँग्रेस आणि ठाकरे गटाचे प्रत्येकी एका मतदारसंघात आमदार आहेत. मात्र बाबा सिद्धिकी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काँग्रेसच्या झिशान सिद्धिकी यांच्या भूमिकेबाबत संभ्रम आहे. त्यामुळे येथे चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :स्वरा भास्करकाँग्रेसलोकसभा निवडणूक २०२४मुंबई उत्तर मध्यमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४