Vidhan Sabha 2019:कानडेवाडीच्या माहेरवाशिणींपुढे अनेक प्रश्नांचा पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 02:55 PM2019-09-27T14:55:19+5:302019-09-27T14:57:43+5:30

गेले दोन महिने संध्यादेवी लढणार नाहीत; पण नंदाताई लढणार असे वातावरण झाले; पण त्यांच्या संभाव्य भाजपप्रवेशाला काहींचा विरोध आहे. तोपर्यंत दोन्ही कॉँग्रेसच्या नेत्यांनी हालचाली करीत माजी आमदार नरसिंगराव पाटील यांचे चिरंजीव राजेश यांचा समर्थ पर्याय तयार करून ठेवला. शरद पवार आणि त्यांची भेटही झाली. एकीकडे राजेश पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गुरुवारीच कुपेकरांच्या घरी जाऊन आले.

Screw before the maverick | Vidhan Sabha 2019:कानडेवाडीच्या माहेरवाशिणींपुढे अनेक प्रश्नांचा पेच

Vidhan Sabha 2019:कानडेवाडीच्या माहेरवाशिणींपुढे अनेक प्रश्नांचा पेच

googlenewsNext
ठळक मुद्देकानडेवाडीच्या माहेरवाशिणींपुढे अनेक प्रश्नांचा पेचनंदाताई कुपेकर गटाच्या कार्यकर्त्यांचे आशास्थान

गुरुवारी (दि. २६) बाबासाहेब कुपेकर यांचा सातवा स्मृतिदिन झाला. कानडेवाडीच्या सरपंचपदापासून ते विधानसभेच्या अध्यक्षपदापर्यंत झेप घेतलेल्या कुपेकरांचा व्हाया जिल्हा परिषद झालेला राजकीय प्रवास अनेकांना प्रेरणादायी आहे यात शंका नाही.

प्रचंड जनसंपर्क, प्रश्न समजून घेण्याची वृत्ती, त्यासाठी सातत्याने पाठपुरावा आणि रोखठोक स्वभाव या पार्श्वभूमीवर त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. साहित्याविषयी आस्था असणारा हा नेता. राजन गवस यांची ‘तणकट’ कादंबरी वाचल्यानंतर कॉ. संपत देसाई यांना रात्री १२ वाजता फोन करून गवस यांच्या साहित्याबाबत बोलणारा असा हा नेता.

याच कुपेकरांच्या घरातील विधानसभा उमेदवारीवरून सध्या घोळ सुरू आहे. कुपेकर यांना तीन मुली. मोठ्या सुनेत्रा त्या सध्या अमेरिकेत असतात. मधल्या नंदिनी आणि धाकट्या जयश्री. तिघीही एम. डी. डॉक्टर. माझ्या तीनही मुली डॉक्टर झाल्या याचे बाबासाहेबांना मोठे कवतिक; पण बाबासाहेब असेपर्यंत या तीनही मुली कानडेवाडीला यायच्या ते माहेरपणासाठी. तोपर्यंत बाबासाहेब विविध पदांवर काम करताना त्यांच्यासोबत नेहमी बंधू बाळ कुपेकर आणि पुतण्या संग्राम. बाबासाहेबांच्याच पाठबळावर संग्राम जिल्हा परिषदेवर निवडून आले. बांधकाम सभापती बनले.

थोडक्यात, बाबासाहेब यांचा राजकीय वारसा संग्राम चालवणार असे वातावरण बाबासाहेब जाण्याआधी होते.
मात्र सात वर्षांपूर्वी अचानक बाबासाहेब सर्वांना सोडून गेले. पोटनिवडणुकीची उमेदवारी आपल्याला मिळेल असे संग्राम यांना वाटले; परंतु ती मिळाली संध्यादेवी यांना. काकी आमदार झाल्या आणि संग्राम त्यांच्यासमवेत मतदारसंघात दिसू लागले. नंतर लगेचच नियमित विधानसभा निवडणूक जाहीर झाली.

यावेळीही संध्यादेवी यांनाच पक्षाने पसंती दिली. त्यामुळे घरातच उभी फूट पडली. संग्राम यांनी ‘जनसुराज्य’कडून निवडणूक लढविली. काकी विरुद्ध पुतण्या असे चित्र निर्माण झाले; परंतु मतदारांनी संध्यादेवी यांना पुन्हा कौल दिला.
बाबासाहेब गेल्यानंतर आईच्या पोटनिवडणुकीसाठी डॉ. नंदिनी बाभूळकर कानडेवाडीला आल्या.

दुसऱ्या निवडणुकीला तर काका, भाऊ विरोधात गेल्याने त्यांनी पूर्णवेळ आईसोबत राहण्याचा निर्णय घेतला. मतदारसंघात त्या गावोगावी फिरू लागल्या. कानडेवाडीच्या वाड्यात त्यांना राजकारणाचे बाळकडू मिळालेलेच होते; त्यामुळे जनतेमध्ये मिसळताना डॉ. नंदिनी बाभूळकरांच्या त्या ‘नंदाताई’ कधी झाल्या, हे त्यांनाही कळले नाही.

‘एव्हीएच’च्या निमित्ताने त्यांनी चंदगडपासून ते मुंबईपर्यंत प्रचंड धावपळ केली. देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत हा प्रश्न नेला. प्रचंड जाळपोळीनंतर अखेर प्रकल्प हलविला गेला. नव्या पिढीशी सहज संवाद साधणाऱ्या नंदाताई या कुपेकरांचा वारसा चालवणार, अशी मतदारसंघात चर्चा सुरू झाली. आघाडीचे सरकार गेले, युतीचे सरकार आले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कुपेकर मायलेकींना सुरुवातीलाच विकासकामांसाठी मोठा निधी देण्याचा निर्णय घेतला. भविष्यात त्या भाजपमध्ये येण्याची खरे म्हणजे ती सुरुवात होती. नंदाताई यांचे पती डॉ. सुश्रूत हे नागपुरातील मोठे डॉक्टर. त्यामुळे फडणवीस यांच्यापासून भाजपच्या अनेक नेत्यांशी त्यांचेही संंबंध. त्यामुळे हे सर्व सोपे होईल असे वाटत असतानाच तीन राज्यांतील निवडणुकीत कॉँग्रेसने बाजी मारली आणि नंदाताई अडखळल्या.

गेले दोन महिने संध्यादेवी लढणार नाहीत; पण नंदाताई लढणार असे वातावरण झाले; पण त्यांच्या संभाव्य भाजपप्रवेशाला काहींचा विरोध आहे. तोपर्यंत दोन्ही कॉँग्रेसच्या नेत्यांनी हालचाली करीत माजी आमदार नरसिंगराव पाटील यांचे चिरंजीव राजेश यांचा समर्थ पर्याय तयार करून ठेवला. शरद पवार आणि त्यांची भेटही झाली. एकीकडे राजेश पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गुरुवारीच कुपेकरांच्या घरी जाऊन आले.

आईच्या मदतीसाठी आलेल्या नंदाताई या कुपेकर गटाच्या कार्यकर्त्यांचे आशास्थान आहेत. त्यामुळे त्यांना निवडणूक न लढविण्याचा निर्णयही मागे घ्यावा लागला; पण परिस्थिती किचकट झाली आहे. कानडेवाडीच्या माहेरवाशिणींपुढे अनेक प्रश्नांचा पेच आहे. या पेचातून त्यांची सुटका कशी होणार, हे येणारा काळ ठरवणार आहे.

- समीर देशपांडे

 

Web Title: Screw before the maverick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.