आमचे अपहरण नाही, कुटुंबियाची तक्रार दबावापोटी; बाराही सदस्यांचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 14:44 IST2023-08-14T14:41:36+5:302023-08-14T14:44:19+5:30
१८ ऑगस्टला अविश्वास ठरावावर होणाऱ्या सभेला उपस्थित राहणार असल्याचे व्हिडीओतून सांगितले.

आमचे अपहरण नाही, कुटुंबियाची तक्रार दबावापोटी; बाराही सदस्यांचा व्हिडीओ व्हायरल
राजू बांते
मोहाडी (भंडारा) : आम्ही आपल्या परिवाराला सांगून घरून बाहेर पडलो आहोत. सदस्यांचे अपहरण करण्यात आले आहे, अशी बनावट तक्रार दाखल करण्यात आली आहे. आम्ही उत्तर प्रदेशात असून सुखरूप असल्याचा संदेश देणारा व्हिडीओ समाज माध्यमांवर खुद्द भ्रमंतीवर गेलेल्या पंचायत समिती सदस्यांनी व्हायरल केला आहे.
पंचायत समिती मोहाडी येथील सभापतींच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर बारा सदस्य भ्रमंतीवर निघाले. दरम्यान शनिवारी करडी पोलिस स्टेशनमध्ये राजू सोयाम व महेश भोंगाडे यांनी अपहरण केल्याची तक्रार केली होती. तक्रारीनुसार भादंवि ३६५ अन्वये तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तथापि, पोलिसांत करण्यात आलेली तक्रार राजकीय दबावातून करण्यात आली आहे.
आमच्यावर लावलेला आरोप निराधार आहे. आम्ही राजकीय दबाव टाळण्याकरिता देवदर्शनाला आलो आहोत. आम्ही बाहेर जाताना परिवारातील लोकांना कल्पना दिली आहे. आम्ही स्वखुशीने बाहेर पडलो आहोत. आम्ही सगळे आता उत्तर प्रदेशात आहोत. आम्ही सगळे सुखरूप आहोत. आम्ही १८ ऑगस्टला अविश्वास ठरावावर होणाऱ्या सभेला उपस्थित राहू. त्यामुळे हा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल करीत असल्याचे सांगितले आहे. त्या व्हिडीओत बारा सदस्य दिसून येत आहेत. त्यांनी हात हलवून आम्ही खुश असल्याचे दाखवून दिल्याचे दिसून येते. हा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने तक्रारकर्ते बॅकफूटवर गेले असल्याचे चित्र आहे.