माजी आमदार व जिल्हा परिषद सदस्यांत खडाजंगी, नागरिकांची जमली गर्दी; गावभर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 17:48 IST2022-05-06T17:21:09+5:302022-05-06T17:48:26+5:30
उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात ही खडाजंगी सुरू होती तेव्हा नागरिकांची एकच गर्दी झाली होती.

माजी आमदार व जिल्हा परिषद सदस्यांत खडाजंगी, नागरिकांची जमली गर्दी; गावभर चर्चा
साकोली (भंडारा) : उपजिल्हा रुग्णालयातील वृक्ष तोडण्यावरून माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते आणि जिल्हा परिषद सदस्य मदन रामटेके यांच्या शुक्रवारी सकाळी साकोलीत चांगलीच खडाजंगी झाली. आवश्यकतेनुसार वृक्ष तोडा, असे माजी आमदारांनी बजावले, तर वन विभागाच्या परवानगीप्रमाणेच वृक्षतोड केली जात असल्याचे जिल्हा परिषद सदस्यांचे म्हणणे होते. उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात ही खडाजंगी सुरू होती तेव्हा नागरिकांची एकच गर्दी झाली होती.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी रुग्णांना अत्याधुनिक सुविधा मिळाव्या, यासाठी निधी मंजूर केला. रुग्णालयाची जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी पाच मजली नवीन इमारत तयार करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन इमारतीचे अंदाजपत्रक व डिझाईन तयार केले. इमारत बांधताना अडचणीचे ठरणारे वृक्ष तोडण्याची शिफारस केली. शासनाने झाडे कापण्याची परवानगी देऊन वन विभागाला प्रकरण हस्तांतरित केले. वन विभागाने नगर परिषद व स्थानिक प्रशासनाची परवानगी घेऊन वृक्षांचा लिलाव केला. हा लिलाव जिल्हा परिषद सदस्य मदन रामटेके यांनी घेतला. त्यांना वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानगीनुसार वृक्ष तोडण्यास सुरुवात केली.
शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात आले. त्यांनी आवश्यकतेनुसार वृक्षतोड, इतर वृक्ष तोडू नका असे बजावले. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य रामटेके यांनी नियमानुसार वृक्ष तोडत असल्याचे सांगितले. त्यावरून माजी आमदारांनी वृक्ष तोडच थांबवा, असे म्हटले. त्यावरून दोघांत चांगलीच खडाजंगी झाली. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दिवसभर या खडाजंगीचीच चर्चा साकोलीत सुरू होती.