घराला भगदाड ; आतमध्ये आढळले ८ ते २० फुटांचे तीन भुयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 14:17 IST2025-03-17T14:14:30+5:302025-03-17T14:17:46+5:30

भंडारा तालुक्याच्या नांदोरा येथील प्रकार : प्रशासन पोहोचले घटनास्थळी

Three 8- to 20-foot-deep tunnels found inside the house | घराला भगदाड ; आतमध्ये आढळले ८ ते २० फुटांचे तीन भुयार

Three 8- to 20-foot-deep tunnels found inside the house

भंडारा : शीर्षक वाचून दचकू नका, होय एका घरात पडलेल्या भगदाड बुजविण्यासाठी घरातील मंडळींनी दगड टाकले. मात्र भगदाड काही भरेना. आतमध्ये उतरून पाहिले असता भंबेरी उडाली. तब्बल आठ ते २० फुटापर्यंतचे तीन भुयार सापडले. हे भुयार घरापर्यंतच सीमित आहे. या घटनेने अख्खे प्रशासनच तिथे उतरले. हा प्रकार भंडारा तालुक्यातील नांदोरा येथे रविवारला महादेव बिसन कोरचाम यांच्याकडे उघडकिला आला.

माहितीनुसार, भंडारा तालुक्याच्या शहापूरपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नांदोरा येथे महादेव कोरचाम यांचे घर आहे. २०१० मध्ये त्यांनी सिमेंटचे पक्क्या घराचे बांधकाम केले होते. होळीच्या दोन दिवसांपूर्वी घराच्या पोर्चमध्ये असलेल्या उजव्या बाजूला जवळपास दोन बाय चार फूट लांबीचे भगदाड पडले बाजूलाच नाली आहे. नाली व घराच्या पोर्चमधून हा भगदाड स्पष्टपणे दिसत होता. हा भाग कसा खचला, याचा शोध घेतला असता, कदाचित माती खचून खड्डा पडला असावा असा प्राथमिक संशय आला.

महादेव कोरचाम यांच्या मुलांनी तो खड्डा बुजवण्याचा प्रयत्न केला. मात्र दगड घालूनही खड्डा बुजत नव्हता. सरतेशेवटी कोरचाम यानचा मुलागा आशिष हा खाली उतरला. यात त्याची भंबेरी उडाली. पूर्व, उत्तर आणि पश्चिम दिशेला जवळपास आठ फूट ते वीस फुटांपर्यंतचे तीन भुयार आढळले. मातीचा हा थर खचलेला आढळला. काही ठिकाणी ओलसरपणाही जाणवला.


नेमका काय असेल प्रकार?

जवळपास चार दिवसांपासून हा भूस्खलनाचा प्रकार घरच्या आतमध्ये घडत होता. मात्र त्याची प्रचिती धुळवळीच्या दिवशी आली. पोर्चमध्ये खड्डा पडल्यानंतर आत मध्ये मोठे भुयार तयार होऊन आहे हे पहिल्यांदाच निदर्शनास आले. मातीचा आकृतीबंध असलेल्या या जमिनीत पाण्याचा प्रवाह असल्याकारणाने व खडकाळ भाग नसल्याने हा भौगोलिक प्रकार घडल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून आले.

बऱ्याच वर्षांपूर्वी होती येथे विहीर

ज्या ठिकाणी कोरचाम यांनी घर बांधले आहे. तिथे ६० ते ७० वर्षांपूर्वी मोठी विहीर असल्याचेही सांगण्यात येत आहे. याबाबत खुद्द महादेव कोरचाम यांनी विहीर असल्याच्या बाबीला दुजोरा दिला. तर घराच्या मागे ४०० मीटर अंतरावरच तलाव आहे. तलाव आणि विहीर यांच्यामधील अंतर्गत पाण्याचा प्रवाहही या भगदाड करण्यासाठी कारणीभूत असू शकतो का? असा निष्कर्षही या निमित्ताने समोर आला. उल्लेखनीय म्हणजे पश्चिम ते पूर्व असा या जमिनीचा उतार आहे.

घटनास्थळी अधिकारी दाखल

रविवारपासून ही घटना उघडकिला आल्यानंतर गावात विविधांगी चर्चेला उधाण आले. घराला भगदाडच पडले, भुयार दिसत आहे. अलीकडून पलीकडे जाता येते, यासह आदी चर्चांना ऊत आले होते. घटनास्थळी भंडाऱ्याचे उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक भूवैज्ञानिक ललित वायकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कुलकर्णी यांच्यासह महसूल प्रशासनातील अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी दाखल झाले. एसडीओ बालपांडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सहायक भूवैज्ञानिक वायकर हे भगदाडमध्ये उतरून नेमका प्रकार काय याची शहानिशा केली. घटनास्थळी जमलेली गर्दी पाहता पोलिसांनी चोक बंदोबस्त लावला होता.

"घडलेला हा प्रकार भौगोलिक बाबींशी निगडीत आहे. भगदाड पडण्याच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. कोरचाम कुटुंबियातील कोणत्याही सदस्याला कुठलीही हानी झालेली नाही. त्यांना सुरक्षितस्थळी व्यवस्था करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला सांगितले आहे."
- गजेंद्र बालपांडे, उपविभागीय अधिकारी भंडारा.

"कोरचाम यांचे जिथे घर आहे तेथील भाग हा संपूर्ण मातीच्या थराचा आहे. या घटनेला भौगोलिक कारणच निमित्त आहे. सॉईल फॉर्मेशन ठिकठिकाणी खचलेले आढळले. माती परीक्षण आणि अन्य तज्ज्ञांच्या विवंचनेतून अधिक माहिती घेण्यात येईल. भगदाडमध्ये पक्के भराव भरले जाईल का? याबाबतही विचार केला जात आहे."

-ललित वायकर, वरिष्ठ भूवैज्ञानिक, पाणीपुरवठा विभाग जि. प. भंडारा.

Web Title: Three 8- to 20-foot-deep tunnels found inside the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.