प्राणवायू देणाऱ्या या इनडोअर व आऊटडोअर झाडांना सर्वाधिक मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 11:19 IST2024-11-27T11:15:05+5:302024-11-27T11:19:33+5:30
गुलाबाला अधिक मागणी : भंडारेकरांचा घर व परसबागेच्या सुशोभीकरणावर भर

These indoor and outdoor plants are most in demand
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अलीकडे शहरांसह ग्रामीण भागातील नागरिकांना आपले घर व परिसर शोभिवंत असावा, असे वाटते. त्यासाठी घर आणि परसबागेत तसेच परिसरात विविध प्रकारच्या झाडांची लागवड केली जाते. यामध्ये वड, पिंपळ, क्रोटॉन, गुलाब, रबर प्लांट, तुळस, अशोका अशा झाडांची लागवड करण्यावर सर्वाधिक भर दिला जातो.
शोभेची काही झाडे ही घराच्या आतमध्ये सावलीत वाढतात, तर काही झाडे सावलीत वाढत नाहीत, बाहेर मोकळ्या परिसरात वाढतात. त्यामुळे झाडे लावताना झाडांच्या वाढीचा, त्यांच्यापासून होणारे फायदे या सर्वच बाबींचा विचार केला जातो. सर्वाधिक ऑक्सिजनचा पुरवठा करणारे पिंपळ, कडुनिंब, वड, जांभूळ, तुळस, अशोका, बेलाची झाडे यांची जास्त लागवड केली जाते. इनडोअरसाठी एग्लिनिया, कॅथेलिया, मनी प्लांट, रबर प्लांट, स्पायडर प्लांट, टेबल कॉनी, सेक प्लांट, पीसीलिली, आर. के. पाम, सकुलॅन्ड आदी कमी उंचीची आणि सहज वाढणारी झाडे लावली जातात.
विक्रीतही गुलाब 'राजा'
घरात आणि परसबागेत गुलाबाचे झाड नाही, असे कधीच होत नाही. त्यातही विक्रीत 'डच गुलाब' च राजा आहे. गुलाबाचे अनेक प्रकार शहरातील विविध नर्सरीत विक्रीला उपलब्ध केली जातात.
अधिक ऑक्सिजन देणारी झाडं कोणती ?
अलीकडे प्राणवायूसाठी नागरिकांना शहराबाहेर जावे लागते. मात्र, वड, पिंपळ, कडुनिंब, तुळस, जांभूळ आणि अशोकाची झाडे जास्त ऑक्सिजनचा पुरवठा करतात.
दाट सावलीसाठी लावा ही झाडं !
घर आणि परिसरात शोभणाऱ्या झाडांसोबतच मोकळ्या परिसरात सावली देणारे वड, पिंपळ, औंदुबर, कडुनिंब, आंबा, चिंच, करंजी, बदाम ही डेरेदार झाडे लावली जातात. उन्हाळ्यात या झाडांपासून दाट सावली मिळत असते.
आउटडोअरसाठी या झाडांना मागणी
घराच्या आउटडोरमध्ये क्रोटोन, शेवंती, तुळस, गुलाब, चाफा, चंपा, चमेली, मोगरा, जास्वंद, विद्या, ख्रिसमस ट्री ही झाडे लागवडीवर नागरिकां- कडून अधिक प्रमाणात भर दिला जातो.
इनडोअरसाठी या झाडांना मागणी
प्रत्येकाच्या घरात इनडोअ- रमध्ये आवडीनुसार वेगवेगळी झाडे लागतात. यामध्ये एग्लेनिया, कॅथेलिया, मॅरेन्टा, फार्म, बांबू ट्री. बुल्खा, व्हेरिकेट, मनी प्लांट, सकुलॅन्ड आदींचा समावेश आहे.
या रोपांना असते मागणी
- पिंपळ : पिंपळाचे झाड हे सर्वाधिक ऑक्सिजन देणारे झाड आहे. त्यामुळे वृक्षारोपण करणाऱ्यांकडून पिंपळाच्या रोपाला अधिक मागणी आहे.
- चिंच : चिंचेचे झाड सावली देण्यासोबतच उत्पन्न देखील देत असल्याने चिंचेच्या रोपांना मागणी होत आहे.
- गुलाब : गुलाबाच्या रोपांना नेहमीच मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मात्र, डच गुलाबाची फुले जास्त काळ टिकतात. त्यामुळे या गुलाबाच्या रोपांना जास्त मागणी आहे.
- वड : वडाचे झाड मोठे आणि विस्तीर्ण होते. त्यामुळे वडाच्या झाडाला देखील वृक्षप्रेमींकडून मोठी मागणी आहे.
- कडूनिंब : कुठल्याही हवामानात तग धरून राहणारे आणि ऑक्सिजन देणारे झाड म्हणून मागणी आहे.
- जांभूळ : जांभूळ हे स्वादिष्ट फळ असुन या झाडामुळे दाट सावली मिळते.
"घर व परिसर सुशोभीकरणासाठी नागरिक बराच विचार करतात. भविष्यात फायदा कसा, उंची किती. फळधारणा किती, शोभिवंत आहे काय, फुले किती असतात का ? या सर्व बाबी तपासतात. परिसर सुशोभीकरणाला प्राधान्य दिले जाते."
- संजय भोयर, नर्सरीचालक, भंडारा.