भंडारात एकही महिला उमेदवार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 06:00 IST2019-10-10T06:00:00+5:302019-10-10T06:00:38+5:30
तुमसर विधानसभा मतदार संघात दहा उमेदवार रिंगणात असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे. बहुजन समाजपार्टीच्या छाया गभणे आणि अपक्ष उषा केसलकर यांचा समावेश आहे. साकोली मतदार संघात १५ उमेदवार रिंगणात असून त्यात केवळ एक महिला उमेदवार आहे. बळीराजा पार्टीतर्फे उर्मिला आगाशे निवडणूक रिंगणात आहेत.

भंडारात एकही महिला उमेदवार नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राजकारणात महिलांची भागीदारी वाढविण्याचा प्रयत्न सर्वच स्तरात होत असला तरी विधानसभा निवडणुकीत मात्र त्याचा उलट प्रत्यय येत आहे. जिल्ह्यातील तीन मतदारसंघात केवळ तीन महिला रिंगणात आहेत. भंडारा विधानसभा क्षेत्रात तर एकही महिला रिंगणात नाही. राजकीय पक्षांनीही महिलांना उमेदवारी देण्यासाठी फारसा पुढाकार घेतल्याचे दिसत नाही.
भंडारा जिल्ह्यात तुमसर, भंडारा आणि साकोली विधानसभा क्षेत्र आहे. या तीनही ठिकाणावरून ३९ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये केवळ तीन महिलांचा समावेश आहे. भंडारा विधानसभा क्षेत्रात १४ उमेदवार रिंगणात असून सर्वच्या सर्वच पुरुष उमेदवार आहेत. एकाही पक्षाने महिलेला उमेदवारी दिली नाही. उलट उमेदवारी दाखल केलेल्या दोन महिलांनी रिंगणातून माघार घेतली. त्यात मनसेच्या पूजा गणेश ठवकर आणि अपक्ष अनुसयाबाई बावणे यांचा समावेश आहे. तर बहुजन समाज पार्टीकडून नामांकन दाखल करणाऱ्या अनिता कुंजन शेंडे यांचा अर्ज एबी फॉर्म नसल्याने अवैध ठरविण्यात आला होता.
तुमसर विधानसभा मतदार संघात दहा उमेदवार रिंगणात असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे. बहुजन समाजपार्टीच्या छाया गभणे आणि अपक्ष उषा केसलकर यांचा समावेश आहे. साकोली मतदार संघात १५ उमेदवार रिंगणात असून त्यात केवळ एक महिला उमेदवार आहे. बळीराजा पार्टीतर्फे उर्मिला आगाशे निवडणूक रिंगणात आहेत.
जिल्ह्यातून ३९ उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यात केवळ तीन महिलांचा समावेश आहे. महिलांचा राजकारणात सहभाग वाढविण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करीत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र विधानसभेत महिलांसाठी कोणताही मतदार संघ आरक्षित नाही. काही कर्तृत्ववान महिला राज्याच्या राजकारणात आपली छाप सोडत असल्या तरी बहुतांश महिलांना संधीच मिळत नसल्याचे दिसते.
एकही महिला आमदार झाली नाही
भंडारा जिल्ह्यात तीन विधानसभा क्षेत्र असून एकाही मतदारसंघातून अद्यापपर्यंत महिला आमदार झाली नाही. तुमसर, साकोली आणि भंडारा येथून विधानसभेवर पुरुषांनीच वर्चस्व गाजविले आहे. महिलेला मात्र आमदार होण्याची संधीच मिळाली नाही. लोकसंख्येच्या निम्मी संख्या महिलांची असतानाही एकही महिला आमदार भंडारा जिल्ह्यातून विधानसभेत पोहचली नाही. आगामी काळात महिला निश्चितच विधानसभेत पोहचतील अशी अपेक्षा आहे.