मराठीला अभिजात भाषेचा दर्जा हे वैभवी पाऊल !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 11:52 IST2024-10-04T11:50:37+5:302024-10-04T11:52:22+5:30
Bhandara : जिल्ह्यातील सारस्वतांनी केले निर्णयाचे स्वागत

The status of classical language to Marathi is a glorious step!
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय म्हणजे वैभवी पाऊल आहे. अनेक वर्षांचा सुरू असलेला यासाठीचा संघर्ष अखेर गोड निर्णयात बदलला, याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया भंडारा जिल्ह्यातील सारस्वतांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतल्याचे कळताच जिल्ह्यातील साहित्य वर्तुळात आनंदाची लहर पसरली.
हा तर योगायोगच !
चार दिवसांपूर्वीच भाषा सल्लागार समितीची बैठक झाली होती. या बैठकीचे डॉ. हरिश्चंद्र बोरकर हे ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांनी या बैठकीत हाच विषय मांडला होता. योगायोग म्हणजे, त्याबद्दल निर्णयही केंद्र सरकारने घटस्थापनेच्या पहिल्या दिवसाचा मुहूर्त साधून घेतला.
ज्येष्ठ कवि आणि कथाकार प्रमोदकुमार अणेराव म्हणाले, हा निर्णय मराठी बोलणाऱ्या, मराठी साहित्य वाचणाऱ्या आणि मराठी साहित्य सेवा करणाऱ्या व्यक्तीसाठी अतिशय आनंदाची आणि सकारात्मक आहे. गेल्या तीन दशकांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा अशी मागणी सातत्याने होत होती. ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे आणि समितीने अतिशय परिश्रमपूर्वक मराठी भाषेचे अभिजातत्व सिद्ध केले आणि त्याचे ऐतिहासिक प्राचीन मूळ शोधून काढले. त्यासाठी त्यांनी जवळजवळ २५०० वर्षांपूर्वीची मराठी भाषा परंपरा पुढे आणली. मध्यंतरी राजकीय इच्छा शक्तीचा अभाव आणि अनेक व्यवधानांमुळे अभिजात भाषेचा मागणी मागे आणि आणि प्रलंबित पडली होती. आज पाली, बंगाली, आसामी व प्राकृत या भाषांबरोबर मराठी भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, मी घटना निश्चित मराठी भाषिकांना सुखवणारी आणि अभिमानाची आहे
ज्येष्ठ साहित्यिक आणि झाडीबोलीचे अभ्यासक डॉ. हरिश्चंद्र बोरकर म्हणाले, यामुळे मराठी भाषेचे वैभव पुन्हा वाढेल, यात संशय नाही. अग्रगण्य भाषा म्हणून ती उदयास येईल. देशातील घटनामान्य भाषेत मराठी पहिल्या क्रमावर आहे. मराठीतील वाझय प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. आद्यकवी मुकुंदराजांच्या विवेकसिंधु या ग्रंथाची नाळ विदर्भाच्या मातीशी जुळली आहे. महाराष्ट्रात मराठीचे सर्वांत मोठे क्षेत्र विदर्भ आणि वन्हाडात आहे. मराठीतील गद्य प्राचीन असून, त्याचा सन्मान या निमित्ताने झाला, याचा आनंद आहे.
प्रा. सुमंत देशपांडे म्हणाले, अनेक वर्षांची ही मागणी होती. या निर्णयामुळे मराठीचे प्राचीनत्व सिद्ध झाले आहे. मराठी ही मूळ भाषा 10041 होती, यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. या निर्णयामुळे भाषिक संशोधनाला नवा आयाम मिळेल. प्राचीन ग्रंथांची ओळख होऊन मराठीतील वाङ्ग्य प्रकाराला उजाळा मिळेल.
ज्येष्ठ साहित्यिक तथा . एम. पटेल जे महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक ममता राऊत म्हणाल्या, अडीच हजार वर्षांचा इतिहास मराठी भाषेला आहे. अभिजात दर्जा मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. उशिरा का होईना, न्याय मिळाला, याचा आनंद आहे. मराठी मागे पडत होती. गौणत्व येत होते. मात्र, या दर्जामुळे पुन्हा सन्मानाचे दिवस येतील. मराठीचा अभिजात दर्जा जपून, सन्मान वाढविण्याची जबाबदारी आता आपली सर्वांची आहे.