विद्यार्थ्यांची कुंडली डिजिटल लॉकरमध्ये, १२ अंकी अपार आयडी असणार नवीन ओळख
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 11:33 IST2024-11-29T11:30:16+5:302024-11-29T11:33:22+5:30
शैक्षणिक कुंडली एका क्लिकवर : विद्यार्थ्यांसाठी 'अपार' आयडी

Student's details in Digital Locker, New Identity with 12 Digit Apar ID
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने आधार कार्डप्रमाणेच विद्यार्थ्यांची स्वतंत्र शैक्षणिक माहिती डिजिटल स्वरूपात साठविण्याच्या उद्देशाने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्रत्येक विद्यार्थ्यांचा 'अपार' (ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडमिक रजिस्ट्री) नंबर तयार करण्याच्या सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. परिणामी जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध व्हावी, तसेच पाहिजे तेव्हा ती ऑनलाइन स्वरूपात बघता यावी, यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी 'वन नेशन वन स्टुडंट' आयडीच्या धर्तीवर आता प्रत्येक विद्यार्थ्याचा इयत्ता नववीपासून अपार नंबर तयार करण्यात येणार आहे. यामुळे नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती उपलब्ध होणार आहे. हा नंबर डिजी लॉकरलाही जोडण्यात येणार आहे. पुढील एक महिन्यात यावर अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना आहेत. यासंदर्भात २९ व ३० नोव्हेंबर रोजी अपार दिवस साजरा करण्याचे आदेशही सीईओंना दिले आहे.
भंडारा जिल्ह्यात अंमलबजावणी
इयत्ता नववीपासून अपार आयडी तयार करण्याबाबतच्या सूचना शिक्षण विभागाला प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार दिलेल्या निकषानुसार भंडारा जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. यू डायस प्लस प्रणालीच्या ज्या विद्यार्थ्यांचे आधार वैध असेल त्यांचेच अपार आयडी तयार होतील.
ग्राफिकल अॅनालिसिस होणार
'अपार मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड एका शाळेतून दुसऱ्या शाळेत किंवा जिल्हा आणि राज्यामध्ये ऑनलाइन पाठविणे सुलभ होईल. विद्यार्थ्यांचे 'अपार' आयडी विद्या समीक्षा केंद्रांना जोडण्यात येऊन त्या माहितीचे ग्राफिकल अॅनालिसिस करण्यात येईल.
अपार आयडी म्हणजे काय?
ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडमिक रजिस्ट्री नंबर म्हणजेच अपार आयडी होय. यात विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती असेल.
अपारचा होणार हा फायदा
यू डायस प्लस प्रणालीच्या ज्या विद्यार्थ्यांचे आधार वैध असेल, त्यांचेच अपार आयडी तयार होतील, अपारमुळे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा, प्रगती अहवाल, शाळाबाह्य मुलांचा शोध, गळतीचे प्रमाण घटविण्यास मदत करणे आदी बाबी नियंत्रित करण्यात येणार आहेत.
एका क्लिकवर माहिती होणार उपलब्ध
अपारमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचे मॉनिटरिंग सोपे होणार आहे. 'अपार' आयडी तयार झाल्यानंतर तो डिजी लॉकरला जोडण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात साधलेले लक्ष्य, दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल, उपक्रम आणि स्पर्धा परीक्षांमधील यश आदी माहिती ऑनलाइन पाहता येणार आहे.
जिल्ह्यात विद्यार्थ्यांची तयार झाली
अपार आयडी जिल्ह्यात एक हजार ३५७ शाळा असून या शाळांत दोन लाख ५६ हजारच्यावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांची अपार आयडी तयार करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांचे अपार आयडी
अपारमुळे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा, प्रगती अहवाल, शाळाबाह्य मुलांचा शोध, गळतीचे प्रमाण घटविण्यास मदत करणे आदी बाबी डिजीलॉकरमध्ये नियंत्रित करण्यात येणार आहेत. यात सर्वच विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार केले जाणार आहेत. यातून विद्यार्थ्यांची विविध प्रकारची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल.