पाणपोईचे दर्शन झाले दुर्मिळ, सामाजिक संस्थांच्या पुढाकाराची गरज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 14:14 IST2025-02-25T14:13:44+5:302025-02-25T14:14:30+5:30
जनता तहानलेली : बाटलीबंद पाण्यासाठी मोजावे लागतात पैसे

Sighting of Panpoi is rare, need for initiative of social organizations
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पूर्वी उन्हाळा सुरू झाला की, भंडारा शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात व आठवडी बाजारात तसेच सार्वजनिक ठिकाणी आणि शासकीय व निमशासकीय कार्यालयात पाणपोई दिसायची. त्यामुळे लांब प्रवासात थकलेल्या व्यक्तींना अगदी सहज पाणपोईचे थंडगार पाणी मोफत प्यायला मिळत होते. परंतु, आज जिल्ह्यात मोजक्याच ठिकाणी पाणपोई दिसून पडली तरी पाणपोई कुठेच दिसत नाही. बाटलीबंद पाण्याच्या जमान्यात पाणपोईचे दर्शनदेखील दुर्मीळ झाले असल्याची भावना प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रमुख बसस्थानकावर मात्र निःशुल्क पाण्याची सुविधा उपलब्ध दिसते. परंतु, त्या ठिकाणीसुद्धा अनेकदा परिसरात अस्वच्छता दिसून येते. प्रवाशांना पाणी पिण्याची इच्छा होत नाही.
नळाच्या तोट्या तुटल्या, ठोसल्या जातात काठ्या
सार्वजनिक पाणी सुविधांची अनेकदा नागरिकांकडून दुरवस्था केली जाते. अनेकदा नळाच्या तोट्या तोडून त्यात काठ्या ठोसल्या जात असतात.
माठही दुर्मीळ
पूर्वी घराबाहेर पडल्यानंतर कुठे रांजण, माठ, त्यावर लाकडी झाकणी आणि लाल रंगाचा ओला कपडा झाकलेले पाणी पिण्यासाठी रंगीबेरंगी प्लास्टिकचे ग्लास अशी पाणपोई असायची. उन्हाळ्यात शहरात शुद्ध पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी अनेकदा भटकंती करावी लागते. नगरपरिषदेने यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे.
खिशाला भुर्दंड
पूर्वी जार आणि बाटलीबंद पाण्याचा फारसा वापर होत नव्हता. मात्र, अलीकडे जारच्या माध्यमातून पाणी विकत व सवलतीच्या दरात मिळू लागल्याने पाणपोईची पद्धत मागे पडू लागली आहे. पाणपोई नसल्याने पाणी घेऊन पिण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी आर्थिक भुर्दड सहन करावा लागत आहे.
हॉटेलमध्ये पैसे देऊन विकत घ्यावे लागते पाणी
चहा घेण्यासाठी हॉटेलमध्ये गेल्यानंतर स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी सहज मिळत नाही. त्यामुळे विकतचे पाणी घेऊन प्यावे लागते. ज्यांना विकतचे पाणी घेऊन पिणे शक्य नाही अशा सामान्य प्रवाशांचे हाल होताना दिसतात. त्यामुळे सामाजिक संस्था व राजकीय संघटनांनी पुढाकार घेऊन पाणपोई पुन्हा सुरू करणे गरजेचे आहे.
१.५० लाख शहरात शुद्ध पाण्याची वानवा
शहराची लोकसंख्या दीड लाखाच्या घरात आहे. परंतु अनेक वॉर्ड व कॉलनीमध्ये शुद्ध पाण्यासाठी बोंबाबोंब आहे. दुषित पाणी पुरवठा होत असल्याची ओरड आहे
बसस्थानकावर टाकीची अवस्था काय ?
भंडारा शहरातील बसस्थानकावर पाणी पुरविण्यासाठी दोन ठिकाणी व्यवस्था आहे. पाण्याची टाकीही नियमित स्वच्छ केली जात असल्याने नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध होते.
भंडारा शहरात दूषित पाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून सुटलेला नाही. त्यामुळे नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी जार अथवा बाटलीबंद पाणी नागरिकांना घ्यावे लागते.
- संजय भोयर, नागरिक.