शंकरपटातून ग्रामीण अर्थव्यवस्थेत होते लाखोंची उलाढाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 12:39 IST2025-01-07T12:36:56+5:302025-01-07T12:39:36+5:30
Bhandara : कृषी संस्कृतीशी जुळली नाळ

Shankarpat generates a turnover of lakhs in the rural economy
लोकमत न्यूज नेटवर्क
जेवनाळा : दिवाळी पश्चात शेतीचा हंगाम आटोपल्यानंतर ग्रामीण भागात कृषी संस्कृतीशी नाळ जपलेला शेतकरी बांधवांचा अत्यंत जिव्हाळ्याचा व आनंदाचा खेळ म्हणजेच बैलांचा 'शंकरपट' होय. साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गावोगावी पटांचे आयोजन करण्यात येते. यातून मनोरंजनासोबतच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेत लाखोंची उलाढाल होत असून, अनेकांना रोजगारसुद्धा मिळत असतो.
शंकरपट हा केवळ खेळ नसून ती ग्रामीण भागाची परंपरासुद्धा आहे. बैलगाडी शर्यतीला जवळपास ३०० वर्षांची परंपरा आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जानेवारी महिन्यात शंकरपटांचे आयोजन करण्यात येते डिसेंबर महिना आटोपताच पटाच्या दानी तयार करण्याचे काम केले जाते. जिल्ह्याच्या अनेक गावांमध्ये पूर्वीपासूनच पटाच्या दानींसाठी जागा राखीव ठेवण्यात आलेली आहे. तसेच महिन्याच्या तारखासुद्धा पटासाठी फार पूर्वीपासूनच राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. ज्या गावात पटाचे आयोजन केले जाते त्या गावातील लोकांमध्ये जणू उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळते. गावाशेजारील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांना पट पाहण्यासाठी सुट्टी देण्यात येते. तसेच पटाच्या गावी व परिसरातील घरोघरी पाहुण्यांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. शंकरपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळते. पट कमीतकमी दोन दिवसांचा तर अधिकाधिक तीन ते चार दिवसांचासुद्धा असतो. त्यामुळे या काळात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला, कपडे, सौंदर्यप्रसाधने, चहा पाणी, खाद्यपदार्थ, खेळणी, मनोरंजन साहित्याची दुकाने लागून त्यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळतो. रात्री नाटक, कीर्तन, गोंधळ, लावणी, कव्वाली यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असून, ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण दिसून येते.
थरार व आनंद
साधारणपणे पहिल्या दिवशी एक एक जोडी सोडून त्यांचे सेकंद लक्षात घेऊन दुसऱ्या दिवशी समान सेकंद असणाऱ्या जोडीची शर्यंत लावली जाते. या शर्यतीचा आनंद व थरार पाहून अंगावर काटे येतात.
कारागीर, सुतारांना सुगीचे दिवस
सद्यःस्थितीत शेतीच्या कामात बैलांचा वापर फार कमी झालेला असला तरी शंकरपटामुळे देशी गाय व बैल पाळणे यात वाढ होत आहे. पटांच्या आयोजनामुळे छकडा व इतर साहित्य बनविण्यासाठी शेतकऱ्यांची सुताराकडे गर्दी दिसून येत असून, कारागिरांना सुगीचे दिवस आल्याचे दिसून येत आहे.