दीड वर्षीय चिमुकल्याचा टाकीत बुडून मृत्यू; मोहाडी तालुक्यातील दुर्दैवी घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2022 14:30 IST2022-12-12T14:24:24+5:302022-12-12T14:30:36+5:30
गावात हळहळ

दीड वर्षीय चिमुकल्याचा टाकीत बुडून मृत्यू; मोहाडी तालुक्यातील दुर्दैवी घटना
धळगाव (भंडारा) : अंगणात खेळताखेळता दीड वर्षीय चिमुकला नळाच्या पाण्याच्या टाकीत कोसळला. यातच त्याचा बुडून करुण अंत झाला. प्रियांशू जितेंद्र मेहर, असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. ही हृदयद्रावक घटना मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथे रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.
लाखांदूर तालुक्यात गत आठवड्यात एका दीड वर्षीय बालिकेचा टाकीत बुडून मृत्यू झाला होता. त्या घटनेची शाई वाळत नाही तोच प्रकार आज डोंगरगाव येथे घडला. घटनेच्या वेळी प्रियांशूची आई ही अंघोळीला गेली होती. त्यावेळी प्रियांशू हा घराबाहेरील अंगणात खेळत होता. खेळता-खेळता त्याची नजर अंगणातील नळाच्या टाकीकडे गेली. अंघोळ करून चिमुकल्याची आई परतल्यानंतर प्रियांशू न दिसल्याने त्याचा शोध घेतला. आईची नजर पाण्याच्या टाकीकडे गेली असता प्रियांशू बुडलेल्या अवस्थेत आढळला. आईने हंबरडा फोडला. शेजारी धावून आले. प्रियांशूला लगेच मोहाडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत बराच वेळ झाला होता. चिमुकल्याचे कलेवर पाहून अनेकजण हळहळ व्यक्त करीत होते.