अधीक्षक नाही, वेतनच रखडले ! काय आहे शिक्षक संघटनेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 16:05 IST2025-07-05T16:04:31+5:302025-07-05T16:05:54+5:30
शेकडो शिक्षक, कर्मचारी अडचणीत : वेतन पथक कार्यालयातील प्रकार

No superintendent, salary has been delayed! What is the demand of the teachers' union?
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील वेतन पथक कार्यालयात अधीक्षकांचे पद रिक्त असल्यामुळे खाजगी प्राथमिक शिक्षकांच्या वार्षिक वेतनवाढीला अडथळा निर्माण झाला आहे. शेकडो शिक्षकांचे मासिक वेतनही होऊ शकत नाही. दोन वर्षांपासून नियमित अधीक्षक नसल्याने प्रभारी अधीक्षक मनिषा गजभिये यांनी जबाबदारी सांभाळली होती, मात्र त्यांची नागपूर येथे बदली झाली आहे.
१ जुलैपासून लागू होणारी वार्षिक वेतनवाढ शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन मंजूर न झाल्यामुळे शिक्षकांचे जून महिन्याचे वेतन निर्मित होऊ शकलेले नाही. यासह अन्य विविध कामेही रखडली आहेत. आधीच विविध कारणांनी वेतन पथक कार्यालय गाजत असते. त्याचा फटका मात्र असंख्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना बसत आहे.
यासंदर्भात विदर्भ खाजगी प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षण उपसंचालकांना पत्र देत नियमित अधीक्षक नेमण्याची मागणी केली आहे. उपशिक्षणाधिकारी हरिकिशन अंबादे यांनी निवेदन स्वीकारले. शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दारासिंग चव्हाण, कार्यवाह प्रभाकर मेश्राम, टिंकेश लांजेवार, रामरतन केवट, रुपेश नागलवाडे आणि विलास खोब्रागडे यांनी यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. वेतन न झाल्याने शेकडो शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी अडचणीत सापडले आहेत.
काय आहे शिक्षक संघटनेची मागणी
वेतन पथक कार्यालयात नियमित अधीक्षकांची नियुक्ती करावी, वेतनवाढ व वेतन देयकांच्या प्रक्रियेला सुरळीत करावे, शिक्षकांच्या आर्थिक हितासाठी त्वरित कारवाई करावी अशी मागणी शिक्षण उपसंचालकांकडे निवेदनातून केली आहे.
वेतनवाढ मंजुरीसाठी अडथळे
वेतन पथक कार्यालयात अधीक्षक पद रिक्त असल्याने वार्षिक वेतनवाढ ऑनलाईन मंजूर झालेले नाही, जून महिन्यातील वेतन देयक अद्ययावत न होणे, निवड वेतनश्रेणी सुधारणा ऑनलाईन करण्यास अडचण, सेवानिवृत्त शिक्षकांचे सेवा समाप्ती ड्रॉप मंजूर न होणे, भविष्य निर्वाह निधी व वैद्यकीय प्रतिकृती देयकांचे ऑनलाईन न होणे आदी अडथळे येत आहेत.