बाजार समिती निवडणूक; भंडाऱ्यात ९६.५७ तर लाखनीत ९८.३६ टक्के मतदान
By युवराज गोमास | Updated: April 28, 2023 17:45 IST2023-04-28T17:45:09+5:302023-04-28T17:45:32+5:30
शनिवारला निकाल : काँग्रेस व राष्ट्रवादी समर्थीत पॅनलचे विजयाचे दावे

बाजार समिती निवडणूक; भंडाऱ्यात ९६.५७ तर लाखनीत ९८.३६ टक्के मतदान
भंडारा : जिल्ह्यात भंडारा व लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शुक्रवारला मतदान पार पडले. भंडाऱ्यात १९५५ मतदारांपैकी प्रत्यक्ष १८८८ मतदान झाले, मतदानाची टक्केवारी ९६.५७ राहीली. लाखनीत २७४५ मतदारांपैकी प्रत्यक्ष २७०० मतदारांनी मतदान केले. टक्केवारी ९८.३६ राहीली. शनिवारला निकाल घोषीत होणार असून काँग्रेस समर्थीत पॅनल विरुदध राष्ट्रवादी- भाजपा, शिंदे गट समर्थीत पॅनल प्रमुखांनी विजयाचे दावे केले आहेत.
भंडारा व लाखनी येथे काँग्रेस विरुदध राष्ट्रवादी समर्थीत पॅनलमध्ये अत्यंत काट्याच्या लढती झाल्या. भंडारा येथील बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस विरूद्ध राष्ट्रवादी, भाजपा व शिंदे गट मैदानात होता. काँग्रेस पॅनलचे नेतृत्व माजी अध्यक्ष रामलाल चौधरी यांनी केले. तर राष्ट्रवादी समर्थीत पॅनलचे नेतृत्व आमदार नरेंद्र भोंडेकर, नाना पंचबुद्धे व भाजपाचे तालुकाध्यक्ष विनोद बांते यांनी केले. काँग्रेसने सर्व जागा जिंकण्याचा विश्वास दाखविला आहे. तर राष्ट्रवादीही आपल्या पॅनलच्या विजयावर आश्वस्त आहे. मात्र, मतदानानंतर राजकीय विश्लेषक म्हणतात, काँग्रेस सेवा सहकारी संस्था गटात मजबूत दिसली. तर राष्ट्रवादी ग्रामपंचायत गटात डाव साधण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर साम, दंड व भेद या नितीपेक्षा दाम नितीचा सर्वाधिक वापर झाल्याचे बोलले जाते.
पवनी व लाखांदूरात ३० एप्रिलला मतदान व मोजणी
दुसऱ्या टप्प्यातील पवनी व लाखांदूर बाजार समितीसाठी ३० एप्रिल रोजी मतदान होणार आहे. येथेही अत्यंत चुरशीचा सामना रंगणार आहे. मतदानाच्या अर्धा तासानंतर मतगणना होणार आहे.