Maharashtra Election 2019 ; भंडारात नरेंद्र भोंडेकरांचा २३,६७७ मतांनी विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 06:00 IST2019-10-25T06:00:00+5:302019-10-25T06:00:37+5:30
निवडणुकीचा कालावधीत विधानसभा क्षेत्रात कोण मुसंडी मारणार याची चर्चा रंगायची. भंडारा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या उमेदवारासह भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवारानेही निवडणुकीच्या रणसंग्रामात उडी घेतली होती. यात शिवसेनेच्या वाट्याला भंडारा मतदारसंघ न आल्याने नाराज असलेल्या शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी बंडखोरी केली.

Maharashtra Election 2019 ; भंडारात नरेंद्र भोंडेकरांचा २३,६७७ मतांनी विजय
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्याच्या राजकारणात भंडारा विधानसभा क्षेत्र नेहमीच चर्चेचा केंद्रबिंदू राहिला आहे. नेहमीच पक्ष उमेदवाराला पसंती देणारा भंडारा मतदारसंघातील मतदार राजाने यंदा अपक्ष उमेदवाराला पसंती देत विजयाची माळ घातली. अपक्ष उमेदवार नरेंद्र भोंडेकर हे २३ हजार ६७७ मतांनी विजयी झाले. त्यांनी भाजपचे अरविंद भालाधरे यांचा पराभव केला.
निवडणुकीचा कालावधीत विधानसभा क्षेत्रात कोण मुसंडी मारणार याची चर्चा रंगायची. भंडारा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या उमेदवारासह भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवारानेही निवडणुकीच्या रणसंग्रामात उडी घेतली होती. यात शिवसेनेच्या वाट्याला भंडारा मतदारसंघ न आल्याने नाराज असलेल्या शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी बंडखोरी केली. अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांसमोर मानस व्यक्त करून निवडणूक लढविली.
गुरूवारी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला प्रारंभ झाल्यापासूनच अपक्ष उमेदवार नरेंद्र भोंडेकर आघाडीवर होते. शेवट्या फेरीत त्यांनी चांगलीच आघाडी घेतली. भाजपच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. मध्यंतरीच्या फेरीमध्ये मतांच्या आघाडीचे अंतर घटत असल्याचे समोर येत होते. मात्र त्यानंतर वर्चस्वपणा कायम राहिला. १६ व्या फेरीनंतर चित्र स्पष्ट होत गेले. भोंडेकर यांनी एक लाख १७१७ मते मिळाली. ढोल-ताशांच्या गजरात विजयी मिरवणूक काढण्यात आली.
1,01,717 मिळाली मते
विजयाची तीन कारणे...
1भंडारा व पवनी दोनही तालुक्यात नागरिकांच्या गाठीभेटीमुळे ते सातत्याने संपर्कात असायचे. याचाच फायदा त्यांना निवडणुकीत झाला. कार्यकर्त्यांची मने सांभाळून पक्ष बांधणीवरही त्यांनी विशेष लक्ष दिले.
2माजी आमदार म्हणून सातत्याने जनसंपर्क ठेवला. अन्यायाला वाचा फोडीत नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य दिले.
3जिल्ह्यातील बेरोजगारांना न्याय देण्याची त्यांची वचनबद्धता त्यांना कामी आली.