Maharashtra Election 2019 ; तीन विधानसभा क्षेत्रात चार उमेदवारांचे नामांकन अवैध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 06:00 IST2019-10-06T06:00:00+5:302019-10-06T06:00:39+5:30
तुमसर, भंडारा आणि साकोली विधानसभा मतदार संघासाठी ७० उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. शनिवारी या नामांकनाची छाननी करण्यात आली. त्यात चार उमेदवारांचे नामांकन अवैध ठरविण्यात आले. तुमसर येथे १६ उमेदवारांनी २८ नामांकन दाखल केले होते. त्यापैकी सदाशिव शिवा ढेंगे यांचे नामांकन अवैध ठरले. त्यांनी अर्जासोबत विहित नमुन्यात प्रतिज्ञापत्र सादर केले नाही.

Maharashtra Election 2019 ; तीन विधानसभा क्षेत्रात चार उमेदवारांचे नामांकन अवैध
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रात चार उमेदवारांचे नामांकन अवैध ठरले असून ६६ उमेदवारांचे नामांकन वैध ठरले आहेत. साकोली येथे दोन, भंडारा व तुमसर येथे प्रत्येकी एक नामांकन रद्द झाले. नामांकनासोबत एबी फॉर्म आणि अपूर्ण प्रतिज्ञालेख आदी कारणावरून नामांकन अवैध ठरविण्यात आले.
तुमसर, भंडारा आणि साकोली विधानसभा मतदार संघासाठी ७० उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. शनिवारी या नामांकनाची छाननी करण्यात आली. त्यात चार उमेदवारांचे नामांकन अवैध ठरविण्यात आले. तुमसर येथे १६ उमेदवारांनी २८ नामांकन दाखल केले होते. त्यापैकी सदाशिव शिवा ढेंगे यांचे नामांकन अवैध ठरले. त्यांनी अर्जासोबत विहित नमुन्यात प्रतिज्ञापत्र सादर केले नाही. तसेच शपथ घेतली नव्हती. सध्या येथे १५ उमेदवारांचे नामांकन वैध ठरले आहे.
भंडारा येथे २६ उमेदवारांनी ३९ नामांकन दाखल केले होते. छाननीअंती अनिता कुंजन शेंडे यांचे नामांकन अवैध ठरविण्यात आले. त्यांनी बहुजन समाज पार्टीकडून नामांकन दाखल केले होते. परंतु पक्षाचा एबी फॉर्म जोडला नव्हता. येथे २५ उमेदवारांचे नामांकन वैध ठरविण्यात आले आहे. साकोली विधानसभा क्षेत्रात २८ उमेदवारांनी ४२ नामांकन दाखल केले होते. छाननीअंती दोन नामांकन अवैध ठरले. त्यात आमदार राजेश काशीवार आणि नानाजी चेटुले यांचा समावेश आहे. काशीवार यांनी भाजपकडून नामांकन दाखल केले होते. परंतु पक्षाचा एबी फॉर्म दाखल केला नव्हता. चेटुले यांचे प्रतिज्ञानपत्र अपूर्ण असल्याने त्यांचे नामांकन अवैध ठरविण्यात आले. येथे २६ उमेदवारांचे नामांकन वैध ठरले आहे.
शनिवारी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी भंडारा, तुमसर आणि साकोली यांच्यास्तरावर दाखल झालेल्या नामांकन अर्जाची छाणणी करण्यात आली आहे. ६६ उमेदवार कायम असले तरी नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी किती जण निवडणूक रिंगणातून माघार घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले.
विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन मागे घेण्याची ७ आॅक्टोबर ही अंतिम तारीख आहे. जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात आता ६६ उमेदवार रिंगणात आहेत. आता यापैकी किती उमेदवार आपले नामांकन मागे घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी सोमवारी या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.