Maharashtra Election 2019 ; निवडणुकीने आले सुगीचे दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 06:00 IST2019-10-18T06:00:00+5:302019-10-18T06:00:46+5:30
सध्या दिवसा उष्णतामानात वाढ झाली तरी कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला नाही. तुमसर व मोहाडी तालुक्याच्या सीमा भौगोलिक दृष्ट्या लागून असल्या तरी सुमारे ४० ते ५० किमी परिसरात हा मतदार संघ पसरलेला आहे. लहान-मोठी गावे तथा तुमसर व मोहाडी शहराचा त्यात समावेश आहे. चारचाकी व दुचाकी वाहनांनी प्रचार केला जात आहे.

Maharashtra Election 2019 ; निवडणुकीने आले सुगीचे दिवस
मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर मतदार संघात प्रचार शिगेला पोहोचला आहे. चार दिवस शिल्लक आहेत. तुमसर व मोहाडी तालुक्यात खाणावळीला सध्या सुगीचे दिसत आले आहेत. कार्यकर्त्यांचे जत्थे ढाब्यावर, हॉटेलमध्ये गर्दी करताना दिसत आहे. निवडणुकीची तारीख जशी जवळ येत आहे तशी कार्यकर्त्यात धाकधुक वाढली आहे. सध्या दिवसा उष्णतामानात वाढ झाली तरी कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला नाही.
तुमसर व मोहाडी तालुक्याच्या सीमा भौगोलिक दृष्ट्या लागून असल्या तरी सुमारे ४० ते ५० किमी परिसरात हा मतदार संघ पसरलेला आहे. लहान-मोठी गावे तथा तुमसर व मोहाडी शहराचा त्यात समावेश आहे. चारचाकी व दुचाकी वाहनांनी प्रचार केला जात आहे. सायंकाळी ही सर्व कार्यकर्ते मंडळी शहरातील ढाब्यावर व हॉटेलमध्ये गोळा होतात. त्यामुळे सध्या खाणावळी व हॉटेल्स हाऊसफुल्ल दिसत आहेत.
मजुरांना मिळाले काम
गावखेड्यात सध्या शेतीची कामे सुरु आहेत. धान कापणीला सुरूवात झाली आहे, परंतु गाव खेड्यातील नागरिक सध्या प्रचारात मग्न दिसत आहे. त्यांच्याही हाताला काम मिळाले आहे. २१ ऑक्टोबरनंतरच शेतीच्या कामात मजूर परतणार आहेत. गाव, शहरात सध्या निवडणुकीची हवा तयार झाली आहे.
नियमांत बसवून प्रचार शिगेला
विधानसभा निवडणुकांत प्रचार सभा जितक्या महत्त्वाच्या असतात, तितक्याच गटाच्या बैठकीतील चर्चाही महत्त्वाच्या अन् त्या प्रभावी घडण्यासाठी सध्या सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा पूरक ठरू लागल्या. मोठया संस्थांबरोबरच गावातील लहान संस्थांच्या वार्षिक सभा अद्यापही सुरू आहेत. त्यामुळे आपल्या नेत्याच्या निवडणुकीची तयारी करण्यासंदर्भात एकत्रित चर्चा करण्याची संधी साधली जात आहे. आयोगाच्या परवानगीने गावोगावी सभा घेण्याचा धडाका सुरू झाला आहे.
सोशल मिडिया सेल
सोशल मिडियार सध्या एकेरी वाक्याचा उपयोग करून पोस्ट घालण्यात येत आहे. त्यात व्हॉट्स अॅप व फेसबुक, ट्वीटचा समावेश आहे. व्यक्तीगत, खाजगी आयुष्याबाबत बदनामीकारक व भ्रष्टाचाराबाबत पोस्ट घालण्याचा सपाटा सुरू झाला आहे. कोणताही आर्थिक लेनदेन झाल्याचा पुरावा उपलब्ध नसताना बदनामीकारक पोस्ट घातल्या गेल्या त्यांची शहानिशा संबंधित विभागाकडून सुरू झाली आहे. उच्चस्तरीय सोशल मीडिया सेल ही कामे बघत आहे. यामध्ये कारवाई होणार असल्याची माहिती आहे.