Maharashtra Election 2019 : ३९ उमेदवारांचे भाग्य मशीनबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 05:00 IST2019-10-22T05:00:00+5:302019-10-22T05:00:22+5:30
साकोली विधानसभा मतदारसंघात भाजपचे डॉ. परिणय फुके, काँग्रेसचे नाना पटोले, वंचित बहुजन आघाडीचे सेवक वाघाये यांच्यासह १५ उमेदवारांचे भाग्य मशीनबंद झाले. भंडारा मतदारसंघात महायुतीचे अरविंद भालाधरे, महाआघाडीचे जयदीप कवाडे, अपक्ष नरेंद्र भोंडेकर यांच्यासह १४ तर तुमसर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे, भाजपचे प्रदीप पडोळे यांच्यासह दहा उमेदवारांचे भाग्य मशीनबंद झाले.

Maharashtra Election 2019 : ३९ उमेदवारांचे भाग्य मशीनबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तीन मतदारसंघातील ३९ उमेदवारांचे भाग्य मशीनबंद झाले. सकाळी संथगतीने सुरू झालेल्या मतदानाला सायंकाळी पावसामुळे काही काळ व्यत्यय आला. जिल्ह्यात सरासरी ७० टक्के मतदानाची नोंद झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत तीनही मतदारसंघात ६४.०१ टक्के मतदान झाले होते. जिल्ह्यात काही ठिकाणी मशीनमध्ये तांत्रिक दोष निर्माण होण्याच्या घटना वगळता जिल्ह्यात शांततेत व सुरळीत मतदान पार पडले.
साकोली विधानसभा मतदारसंघात भाजपचे डॉ. परिणय फुके, काँग्रेसचे नाना पटोले, वंचित बहुजन आघाडीचे सेवक वाघाये यांच्यासह १५ उमेदवारांचे भाग्य मशीनबंद झाले. भंडारा मतदारसंघात महायुतीचे अरविंद भालाधरे, महाआघाडीचे जयदीप कवाडे, अपक्ष नरेंद्र भोंडेकर यांच्यासह १४ तर तुमसर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे, भाजपचे प्रदीप पडोळे यांच्यासह दहा उमेदवारांचे भाग्य मशीनबंद झाले. आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती २४ ऑक्टोबरच्या मतमोजणीची.
जिल्ह्यात सकाळी ७ वाजता मतदानाला प्रारंभ झाला. ग्रामीण भागात सकाळपासूनच उत्साह दिसत होता. तर शहरी भागात सकाळी ११ वाजेपर्यंत संथगतीने मतदान झाले. त्यानंतर दुपारी मतदानाने वेग घेतला. निवडणुकीमध्ये महिला मतदारांचा उत्साह वाखान्याजोगा होता. अनेक ठिकाणी महिलांनी मतदानासाठी रांगा लावल्याचे चित्र दिसत होते. निवडणुकीत दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांनी हिरीरीने सहभाग नोंदविला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत तुमसर मतदारसंघातील ३५६ मतदान केंद्रावर तीन लाख दोन हजार ९२३ मतदारांपैकी दोन लाख ५४४ मतदारांनी हक्क बजावला. येथे ६६.२० टक्के मतदानाची नोंद झाली होती. भंडारा विधानसभा क्षेत्रात ४५६ मतदान केंद्रावर तीन लाख ७० हजार ५७४ मतदारांपैकी दोन लाख २० हजार ५८७ मतदारांनी मतदान केले. येथे ५९.५३ टक्के मतदानाची नोंद झाली. तर साकोली विधानसभा क्षेत्रातील ३९४ मतदान केंद्रावर तीन लाख १८ हजार ३९३ मतदारांपैकी दोन लाख १३ हजार ४७६ मतदारांनी मतदान केले. येथे ६७.५३ टक्के मतदान झाले.
सखी आदर्श मतदान केंद्रावर मतदानासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. जिल्ह्यातील १२५ मतदान केंद्रावर वेबकॉस्टींगच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने मतदानाच्या प्रक्रियेवर थेट लक्ष केंद्रीत केले होते.
व्होटर स्लिपने अनेकांचा गोंधळ
निवडणूक विभागाच्यावतीने मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी फोटो वोटर स्लिप मतदारांना वितरित करण्यात आली होती. अनेक मतदार त्यालाच ओळखपत्र समजून मतदान केंद्रावर पोहचले. मात्र मतदान केंद्रावर वोटर स्लिप ओळखपत्र नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अनेकांना परत जावून आपले निवडणूक ओळखपत्र आणावे लागले. तुमसर येथील १८७ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर एक वयस्क महिला वोटर स्लिप घेवून पोहचली. त्यावेळी वोटर स्लिपला ओळखपत्राच्या रूपात स्विकारण्यास मतदान केंद्राधिकाऱ्याने निकार दिला. मतदान केंद्रावर घरी परत जावून प्रशासनाने निर्धारित केलेले ओळखपत्र आणून तिच्यावर मतदान करण्याची वेळ आली.
सकाळी ९ वाजेपर्यंत ३.८९ टक्के मतदान
भंडारा जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ३.८९ टक्के मतदान झाले होते. तुमसरमध्ये ४.२८, भंडारा १.३० आणि साकोलीमध्ये ६.५५ टक्के मतदानाची नोंद झाली. शहरी भागात सकाळच्यावेळी मतदानाची गती अतिशय संथ असल्याचे दिसून आले. मात्र त्यानंतर मतदानाने वेग घेतला. तुमसरमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत १९.३०, भंडारा १७.२०, साकोली २०.५५ असे जिल्ह्यात १८.९१ टक्के मतदान झाले. दुपारी १ वाजेपर्यंत ३१.४५ टक्के मतदानाची नोंद झाली. यात तुमसर ३५.०३, भंडारा २७.२० आणि साकोली ३३ टक्के मतदानाची नोंद झाली होती. दुपारी ३ वाजेपर्यंत ५०.५६ टक्के मतदान झाले होते. त्यात तुमसर ५१.५६, भंडारा ४७.५२, साकोली ५३.१६ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.
भंडारा शहरात पावसाचा व्यत्यय
जिल्ह्यात सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास भंडारा शहरासह परिसरात पावसाला सुरूवात झाली. सुमारे अर्धा तास रिमझिम पाऊस बरसत होता. या पावसामुळे ५ वाजतानंतर अनेक जण मतदान केंद्रावर पोहचू शकले नाही.