Maharashtra Election 2019 ; अपक्षांनी घेतली ३०.७५ टक्के मते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 06:00 IST2019-10-26T06:00:00+5:302019-10-26T06:00:35+5:30
भंडारा जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघात ३९ उमेदवार रिंगणात होते. त्यात २० अपक्ष उमेदवारांचा समावेश होता. भंडारात आठ, साकोलीत सात आणि तुमसरमध्ये पाच अपक्ष उमेदवार रिंगणात होते. या अपक्षांनी प्रमुख दोन अपक्ष उमेदवार वगळता इतर अपक्षांनी तीन व चार अंकी मते घेतली.

Maharashtra Election 2019 ; अपक्षांनी घेतली ३०.७५ टक्के मते
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोणतीही निवडणूक अपक्षांना लढविणे कठीन जाते. मतांची बेरीज शून्यापासून सुरू होते. मात्र भंडारा मतदारसंघात अपक्षाने इतिहास घडवित विजय संपादित केला. तीनही मतदारसंघातील २० अपक्ष उमेदवारांनी मतदानाच्या ३०.७५ टक्के मते घेतली. त्यात तुमसर आणि भंडारा आघाडीवर आहे. जिल्ह्यात सहा लाख ७१ हजार ८२१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी अपक्षाच्या वाट्याला दोन लाख ६२९ मते गेली. यामुळे अनेकांचे गणितही बिघडले.
भंडारा जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघात ३९ उमेदवार रिंगणात होते. त्यात २० अपक्ष उमेदवारांचा समावेश होता. भंडारात आठ, साकोलीत सात आणि तुमसरमध्ये पाच अपक्ष उमेदवार रिंगणात होते. या अपक्षांनी प्रमुख दोन अपक्ष उमेदवार वगळता इतर अपक्षांनी तीन व चार अंकी मते घेतली.
भंडारा विधानसभा क्षेत्रात पहिल्यांदाच अपक्ष उमेदवाराचा विजय झाला. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नरेंद्र भोंडेकर यांना मतदारांनी पसंती देत विधानसभेत पाठविले. अपक्ष एवढी मोठी आघाडी मारेल काय, अशी साशंकता सुरूवातीला होती. मात्र नरेंद्र भोंडेकर यांनी संपूर्ण मतदारसंघात आपली पकड निर्माण करत विजय खेचून आणला. भंडारा मतदारसंघात दोन लाख ३१ हजार ७९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी अपक्षांना एक लाख १७ हजार ७९३ मते मिळाली. झालेल्या मतदानाच्या ५०.८१ टक्के मते अपक्षांनी मिळविली. त्यात सर्वाधिक मते नरेंद्र भोंडेकर यांना एक लाख एक हजार ७१७ मते मिळाली. त्याखालोखाल अपक्ष प्रशांत बालक रामटेके यांनी नऊ हजार ८८७ मते घेतली. वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारापेक्षाही ही मते अधिक आहेत.
तुमसर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू कारेमोरे यांची थेट लढत अपक्ष आणि भाजप बंडखोर चरण वाघमारे यांच्यासोबत झाली. या अटीतटीच्या लढतीत राजू कारेमोरे यांनी विजय संपादित केला. मात्र या मतदारसंघातही अपक्षांनी घेतलेली मते लक्षणीय आहे. दोन लाख १३ हजार ४१४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी ८५ हजार ३७२ मते अपक्षांना मिळाली. त्यात सर्वाधिक ७९ हजार ४९० मते एकट्या चरण वाघमारे यांनी मिळविली. इतर उमेदवार मात्र तीन हजारापेक्षा अधिक मते घेवू शकले नाही. अपक्ष डॉ. पंकज कारेमोरे यांनी तीन हजार १५८ मते घेतली. यंदाच्या निवडणुकीत तुमसर आणि भंडारात अपक्षांचा चांगलाच बोलबाला होता.
साकोलीत अपक्षांना केवळ १.५२ टक्के मते
साकोली विधानसभा मतदारसंघात अपक्षांना मात्र हजारचा आकडाही पार करता आला नाही. येथे १५ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी सात जणांनी अपक्ष निवडणूक लढली. दोन लाख २६ हजार ५८३ मतांपैकी अपक्षांच्या वाट्याला तीन हजार ४६४ म्हणजे १.५२ टक्के मते मिळाली. येथे सर्वाधिक ७१८ मते सुभाष बावनकुळे या अपक्ष उमेदवाराने मिळविली.