१४ वर्षांनंतर भंडारा जंगलात दिसला 'इंडियन ग्रे वुल्फ'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 12:20 IST2025-04-16T12:18:58+5:302025-04-16T12:20:32+5:30

Bhandara : वनक्षेत्रात आढळली भारतीय लांडग्याची दुर्मीळ प्रजाती

'Indian Gray Wolf' spotted in Bhandara forest after 14 years | १४ वर्षांनंतर भंडारा जंगलात दिसला 'इंडियन ग्रे वुल्फ'

'Indian Gray Wolf' spotted in Bhandara forest after 14 years

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
तब्बल १४ वर्षांच्या खंडानंतर भंडारा वनविभागाच्या रावणवाडी परिसरात 'इंडियन ग्रे वुल्फ' म्हणजेच भारतीय लांडगा आढळला आहे. लुप्तप्राय होत चाललेला हा लांडगा पुन्हा एकदा भंडारा परिसरात दिसल्याने वन्यजीव अभ्यासक, छायाचित्रकार आणि स्थानिक नागरिकांमध्ये उत्सुकता आणि खळबळ दोन्ही निर्माण झाली आहे. रविवारी सकाळी वाइल्ड वॉच फाउंडेशनचे सदस्य असलेले वाइल्डलाइफ फोटोग्राफर विवेक हुरा यांना रावणवाडी येथील एका शेताजवळ हा लांडगा दिसला. यामुळे भंडारा परिसरात लांडग्यांच्या संभाव्य वास्तव्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.


विवेक हुरा यांच्या मते, लांडग्यांची संख्या, विचरण आणि त्यांच्या पर्यावरणीय भूमिकेबाबत अधिक सखोल अभ्यासाची गरज आहे. भंडारा वनक्षेत्रात लांडग्यांची उपस्थिती ही त्यांच्या अधिवासाच्या विस्ताराचे द्योतक असू शकते; पण यासाठी अधिक सखोल अभ्यास आवश्यक आहे. वाइल्ड वॉच फाउंडेशनमार्फत हा रेकॉर्ड आणि जीपीएस लोकेशन डब्ल्यूडब्ल्यूएफ व वन्यजीव संस्था, देहरादून यांच्याशी शेअर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.


२०१२ मध्ये एफडीसीएमच्या सोनेगाव वन क्षेत्रात वाइल्ड वॉच फाउंडेशनचेच सदस्य नरेंद्र गुर्जर, शैलेंद्र राजपूत, नदीम खान आणि सर्वेश दीपक चड्डा यांनी दोन लांडगे पाहिले होते. या भागात भारतीय लांडगा तब्बल १४ वर्षांनंतर आढळला आहे. भंडारा वनक्षेत्रात त्याच्या अस्तित्वाचे हे संकेत मानले जात आहेत.


गंभीर संकटग्रस्त' श्रेणीत
भारतीय लांडगा 'गंभीर संकटग्रस्त' या श्रेणीत असून, तो मुख्यत्वे मध्य भारतातील काही ठिकाणीच आढळतो. या प्रजातीची संख्या कमी होत चालली आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील अर्थ-सदाहरित जंगलांमध्येही या लांडग्यांचे अस्तित्व असल्याचे रामसर साइटच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.


"ही फार महत्त्वाची नोंद आहे. या नव्या माहितीच्या आधारे वनविभागाने परिसरात निगराणी वाढवण्याची आणि सविस्तर सर्वेक्षण करण्याची योजना आखली आहे. या संकटग्रस्त प्रजातीचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी स्थानिकस्तरावर पावले उचलली जातील."
- राहुल गवई, उपवनसंरक्षक, भंडारा
 

Web Title: 'Indian Gray Wolf' spotted in Bhandara forest after 14 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.