मामा तलावांमध्ये वाढले अतिक्रमण, सिंचन सुविधा निम्म्यावर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 13:13 IST2024-11-30T13:13:58+5:302024-11-30T13:13:58+5:30
Bhandara : अतिक्रमण निघणार केव्हा? जिल्हा परिषद घेणार का पुढाकार?

मामा तलावांमध्ये वाढले अतिक्रमण, सिंचन सुविधा निम्म्यावर !
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात १,१५४ मामा तलावांची संख्या आहे. परंतु, वर्षानुवर्षांच्या दुर्लक्षित धोरणांमुळे जिल्ह्यातील मामा तलावांची स्थिती दयनीय झाली आहे. अतिक्रमण, देखभाल दुरुस्तीचा अभाव यामुळे शहरालगतचे अनेक तलाव अखेरच्या घटका मोजत आहेत. पर्याप्त निधीच मिळत नसल्याने स्थिती गंभीर आहे.
अतिक्रमण व साठलेल्या गाळांमुळे तसेच नादुरुस्त पाळ व लिकेज गेटमुळे अनेक तलावांची सिंचन क्षमता निम्म्यावर आली आहे. जिल्हा परिषद प्रशासन अतिक्रमण काढण्यासाठी पुढाकार घेणार काय, या प्रश्न विचारला जात आहे.
गोंड राजांच्या साम्राज्यात पूर्व विदर्भात तलावांची निर्मिती करण्यात आली. ब्रिटिशांच्या काळात सर्व तलाव तत्कालीन जमीनदार अर्थात मालगुजारांच्या ताब्यात गेले. म्हणूनच या तलावांना आता माजी मालगुजारी अर्थात मामा तलाव म्हणून ओळखले जाते. या तलावांची साठवण क्षमता ८७.२४ दलघमी असून २४ हजार ९२५ हेक्टर सिंचन क्षमता आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात मामा तलाव आहेत. सिंचनासोबतच या तलावांचा उपयोग घरगुती वापराचे पाणी, जनावरांना पिण्याचे पाणी व मत्स्यपालनासाठीही केला जातो. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून या तलावांतील गाळ काढण्यात आला नाही. अनेक तलावांची पाळी नादुरुस्त असून पावसाळ्यात पाणी वाहून जाते. तलावांवर अतिक्रमण झाले असून देखभाल दुरुस्ती होत नाही.
जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या या तलावांच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी निधी पर्याप्त निधी मिळत नाही. त्यामुळे तलावांच्या देखभाल, दुरुस्तीला अडचणी येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते.
जलयुक्त शिवारामुळे काहीसे पालटले रूपडे
भंडारा जिल्ह्यातील मामा तलावांचे खोलीकरण, पाळी बांधणे, कालव्यांची दुरुस्ती, गेट दुरुस्ती. पाट दुरुस्ती आदींसाठी जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाने मागील तीन वर्षात जलयुक्त शिवार योजनेतून मोठा निधी खर्च केला. त्याचे चांगले परिणामही दिसून आले. काही मामा तलावांचे रूपडे पालटून तलावांची सिंचन क्षमता वाढली आहे. परंतु, अन्य तलाव अद्यापही दुर्लक्षित आहेत.
टप्पा २ मध्ये जिल्ह्यातील १०० गावांची निवड
यावर्षी जलयुक्त शिवार योजना टप्पा क्रमांक २ अंतर्गत जिल्ह्यातील १०० गावांची निवड करण्यात आली. दुसरा टप्प्यात जिल्हा परिषद पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून विविध कामे करण्यात आली. त्यामुळे तलाव दुरुस्तीच्या कामांना गती मिळाली. परंतु, अद्यापही अनेक तलाव दुरुस्तीसाठी निधीच्या प्रतीक्षेत आहेत.