मिरची उत्पादक शेतकऱ्यांना यंदाही हिरव्या मिरचीने रडविले !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 14:57 IST2025-04-01T14:56:09+5:302025-04-01T14:57:59+5:30

सुरुवातीपासूनच रोगराईचे सावट, मालाला भाव नाही : ४० रुपये किलो दराने हिरव्या मिरचीची किरकोळ विक्री

Green chillies made chilli farmers cry this year too! | मिरची उत्पादक शेतकऱ्यांना यंदाही हिरव्या मिरचीने रडविले !

Green chillies made chilli farmers cry this year too!

मंगेश सेलोकर
लोकमत न्यूज नेटवर्क
धुसाळा (कांद्री):
जिल्ह्यात मिरचीचे पीक घेतले जाते. यावर्षी मिरचीचे पीक उत्तम होऊन चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. पण, मिरची उत्पादक शेतकऱ्यांना यंदाही हिरव्या मिरचीने रडविले आहे.


जिल्ह्यात शेतीला जोडधंदा म्हणून मिरचीचे पीक घेतले जाते. धान कापणीनंतर काही शेतकरी उन्हाळी पीक म्हणून हिरव्या मिरचीची लागवड करतात. मिरची उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हिरव्या मिरचीच्या किमतीत फार मोठी घसरण झाली होती. सात ते आठ रुपये प्रतिकिलो या भावाने शेतकऱ्याला मिरची विकावी लागली. परिणामी, मिरची तोडणाऱ्या मजुरांच्या मजुरीसुद्धा शेतकऱ्याला खिशातून द्यावे लागले. येत्या दिवसात चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती; पण मिरचीचे भाव अजूनही वाढले नसल्याने शेतकरी वर्ग चांगलाचा चिंतेत सापडला आहे.


धानाच्या शेतीपेक्षा मिरचीच्या शेतीला खर्च आणि मेहनत जास्त लागते. यंदा सुरुवातीपासूनच मिरचीच्या बागाला रोगराईने घेरले होते. दिवाळीनंतर अनेकदा वातावरणाच्या अदलाबदलीमुळे हलक्या पावसाचा मिरची पिकाला चांगलाच फटका बसला. रासायनिक फवारण्या करून बागांना सावरता आले नाही.


कुटुंबाप्रमाणे जपावे लागते पिकाला
मिरची झाडाची दर दिवस पाहणी करावी लागते. एखाद्या झाडाला रोग दिसल्यास रासायनिक औषधांची फवारणी करावी लागते. एका फवारणी परिणाम न झाल्यास त्यावर पुन्हा जास्त किमतीचे औषध फवारले जातात. आठवड्यातून दोनदा पाणी, रासायनिक खते, वारंवार फवारण्या शेतकऱ्यांना कराव्या लागतात.


चांगला भाव मिळेना, शेतकरी चिंतेत
हिव्या मिरचीला व्यापाऱ्यांकडून उत्तम प्रतीचा भाव मिळत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्याची बोळवण होत आहे. चांगल्या भावाची आशा असताना पुन्हा मिरचीने शेतकऱ्यांना रडविलं, असे चित्र संपूर्ण जिल्ह्यात आहे.


तीन वर्षांपासून उत्पादन व दराची घसरण कायम
दरवर्षी मिरची लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. पण, मागील दोन-तीन वर्षांपासून मिरचीच्या उत्पादनात आणि भावात खूप मोठी घट बघायला मिळते. शेतकऱ्यांनी लावलेला खर्चसुद्धा निघेनासा झाला आहे. खर्च जास्त, उत्पादन कमी अशी अवस्था आहे. बागायती जागा कमी करून पुन्हा धनाची शेती करण्याचा विचार शेतकरी करीत आहेत.


"वातावरणाच्या बदलीमुळे बागावर रोगराईचे सावट पसरले आहे. लाखो रुपयांच्या औषधांचा फवारण्या केल्या, पण पाहिजे तेवढा उत्पन्न मिळाला नाही. अल्प भावामुळे मिरची बागांना लावलेला खर्चही निघेनासा झाला आहे. खर्चाचे बजेट वाढत असून, कर्जाचे ओझे कायम आहे."
- गुरुदेव सेलोकर, शेतकरी, धुसाळा.


 

Web Title: Green chillies made chilli farmers cry this year too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.