आता बस स्थानकांवर घ्या मोफत उपचार ! राज्यातील ३४३ बस स्थानकांवर 'आनंद आरोग्य केंद्र'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 13:47 IST2024-10-14T13:45:47+5:302024-10-14T13:47:48+5:30
महामंडळाची योजना : आनंद आरोग्य केंद्रामार्फत होणार तपासणी, प्रवाशांना मिळणार दिलासा

Get free treatment at bus stations now! 'Anand Arogya Kendra' at 343 bus stations in the state
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून प्रवाशांसाठी विविध सवलती दिल्या जात आहेत. आता महामंडळाने बस स्थानकांमध्ये आरोग्य सेवेसाठी एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाने राज्यातील ३४३ बस स्थानकांवर 'आनंद आरोग्य केंद्र' नावाने दवाखाना सुरू केला जाणार असल्याची घोषणा नवनियुक्त अध्यक्षांनी केली. यानुसार बस स्थानकांच्या ठिकाणी सर्व नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्यासह कमी दरात विविध चाचण्या आणि औषधी मिळण्यास मदत होणार आहेत.
प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन एसटी महामंडळाची लालपरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावत आहे. त्यामुळे प्रवासीही वाट पाहीन, पण एसटीनेच जाईन, अशी भूमिका घेत आहेत. सुरक्षित प्रवासाची हमी असल्याने अनेकजण एसटीला प्राधान्य देतात. दरम्यान, शासनाने विविध घटकांतील प्रवाशांसाठी प्रवासात सवलती दिल्याने दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. त्यातच आता महामंडळाने बस स्थानकात प्रवाशांना 'आनंद आरोग्य केंद्र' नावाने दवाखाना सुरू केला जाणार आहे. लवकरच प्रवाशांच्या सेवेत आरोग्य केंद्र सुरू होणार असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले. त्यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान आता आरोग्यसेवेचाही लाभ मिळण्यास मदत होणार आहे. भंडारा येथील आगारात आनंद आरोग्य केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची आशा पल्लवीत झाली आहे.
चालक, वाहकांची मोफत तपासणी
एसटीच्या उत्पन्नात भर टाकण्यासाठी चालक, वाहकांवर मोठी भिस्त आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी ४० वर्षांवरील चालक-वाहकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यात सीबीसी, थायरॉईड, कोलेस्ट्रॉल, लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन, ईसीजी, मॅमोग्राफी (महिलांसाठी) आदींची बस स्थानकातच तपासणी केली जाणार आहे.
बस स्थानकावर लवकरच सुरू करणार केंद्र
भंडारा विभागांतर्गत असलेल्या बस स्थानकांवर 'आनंद आरोग्य केंद्र' अद्याप सुरू करण्यात आलेले नाहीत. शासनाच्या आदेशानुसार लवकरच बस स्थानकांवर आनंद आरोग्य केंद्र स्थापन केले जाणार आहेत.
काय आहे आनंद आरोग्य केंद्र ?
धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रातील एसटीच्या सर्व बस स्थानकांत 'आनंद आरोग्य केंद्र नावाने दवाखाना सुरू केला जाणार आहे. यात माफक दरात बसस्थानकातील प्रवाशांच्या आरोग्य चाचण्या, औषधी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे
आरोग्य चाचणी केंद्र सुरू करण्यात येणार
एसटी महामंडळाकडून राज्यातील विविध जिल्ह्यांतील बस स्थानकांत 'आनंद आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यात माफक दरात आरोग्य चाचणी, औषधी दिल्या जाणार असून, लवकरच सेवेला सुरुवात केली जाणार आहे. यात प्रवाशांसह एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या विविध वैद्यकीय तपासण्या केल्या जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.