बावणथडीला पूर : महाराष्ट्र-मध्यप्रदेश आंतरराज्य पुलावरून वाहतूक बंद
By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: July 8, 2025 13:36 IST2025-07-08T13:35:53+5:302025-07-08T13:36:26+5:30
Bhandara : सुरक्षेच्या कारणावरून बपेरा सीमेत पोलिसांनी वाहतूक थांबविली

Flood in Bawanthadi: Traffic closed on Maharashtra-Madhya Pradesh interstate bridge
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : बावणथडी नदीवर बांधकाम करण्यात आलेल्या महाराष्ट्र मध्यप्रदेश आंतर राज्य पुलावरून आज मंगळवारी सकाळपासून वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुलावरून वाहतूक धोकादायक असल्याच्या कारणावरून सिहोरा पोलिसांनी बपेरा गावाच्या सीमेत वाहने रोखली आहेत. बावणथडी नदीच्या पुराच्या पातळीत वाढ होत असल्याने सिहोरा गावाला धोका निर्माण झाला आहे. प्रशासन पूर परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे.
सिहोरा परिसरातून गेलेल्या भंडारा बालाघाट राष्ट्रीय महामार्गला बावणथडी नदीवरील पूल महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांना जोडतो. नदीवर रॉप्टर पद्धतीने पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात अनेकदा पूल बुडतो. दोन दिवसापासून दमदार पावसामुळे बावणथडी नदीला पूर आला आहे.
आज मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास बावणथडी नदीच्या पात्राने धोक्याची पातळी ओलांडली. पुलावरून पुराचे पाणी वाहून जाण्यास फक्त १ फूट अंतर शिल्लक असल्याने जिल्हा प्रशासनाला सूचित करून पोलिस निरीक्षक विजय कसोधन व सहकाऱ्यांनी आंतर राज्य पुलावरून वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बपेरा गावाच्या सीमेत वाहने रोखून धरण्यात आली आहेत. यामुळे वाहनाच्या रांगा लागल्या आहेत.
बपेरातील गावकरी अलर्ट
वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असताना बावणथडी नदीच्या पुराला थोप दिली आहे. हे पुराचे पाणी गावात शिरण्याची भीती निर्माण झाली आहे. बपेरा गावातील नागरिक अलर्ट झाले आहेत. महसूल विभाग आणि पोलिस यंत्रणा पूरग्रस्त गावांना भेट देऊन लक्ष ठेऊन आहे.
महाराष्ट्र-मध्यप्रदेश पोलिस सतर्क
सकाळी ११ वाजतानंतर पुराच्या पाण्यात वाढ सुरू झाल्याने पलिकडे मध्यप्रदेशातील पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. बपेरा, महाराष्ट्र आणि मोवाड, मध्यप्रदेश या दोन्ही सीमेवर पोलीस नियुक्त करण्यात आले आहे. दोन्ही राज्याचे पोलीस प्रशासन आंतर राज्य वाहतुकीवर नियंत्रण ठेऊन आहे. राष्ट्रीय महामार्गांवर ट्रॅक्टर आडवे लावून मार्ग बंद करण्यात आला आहे.