हद्दपारीची कार्यवाही टाळण्यासाठी दहा हजार रुपयाची मागणी

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: June 17, 2025 19:13 IST2025-06-17T19:12:23+5:302025-06-17T19:13:44+5:30

Bhandara : पवनीच्या पोलिस नाईकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक

Demand for Rs 10,000 to avoid deportation proceedings | हद्दपारीची कार्यवाही टाळण्यासाठी दहा हजार रुपयाची मागणी

Demand for Rs 10,000 to avoid deportation proceedings

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
हद्दपारीची कारवाई टाळतो, मात्र त्यासाठी १० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी आरोपीच्या भावाकडे करणाऱ्या पवनीतील पोलिस कर्मचाऱ्यावरच आरोपीच्या पिंजऱ्यात पोहचण्याची पाळी आली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला. मात्र संशय आल्याने त्याने लाच स्वीकारली नसली तरी, गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई सुरू आहे.

अजित प्रल्हाद वाहने (३७) असे या पोलिसाचे नाव असून तो पवनीच्या पोलिस ठाण्यात नाईक पदावर कार्यरत आहे. तक्रारदाराच्या भावाविरूद्ध मुंबई पोलिस कायदा कलम ५६ नुसार, पवनी पोलिस ठाण्याकडून हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. त्याच्या हद्दपारीची मुदत दिनांक १३ जूनला संपणार होती. या दरम्यान, अजित वाहने याने हद्दपारीतील संबंधित आरोपीच्या भावाला पोलिस ठाण्यात बोलावले. तुझ्या भावावर पुन्हा तडीपारीची कारवाई किंवा अन्य कसलीही प्रतिबंधक कारवाई करायची नसेल तर त्या बदल्यात १० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. 

या प्रकरणाची तक्रार संबंधित तक्रारदाराने १२ जूनला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली. या तक्रारीवरून १३ आणि १४ जूनला पडताळणी करण्यात आली असता, त्याने स्वत: रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली.

ठरल्यानुसार, १६ तारखेला अजीत वाहने याला १० हजार रुपयांची लाच देऊ केल. मात्र संशय आल्याने त्याने या दिवशी रक्कम स्वीकारण्याचे टाळले. पुन्हा दुसऱ्या दिवशी १७ जूनलाही त्याला रक्कम देऊ केली. मात्र तेव्हाही त्याने टाळले. त्यासाठी विभागाने पंचांचेही नियोजन केले होते. अखेर अजित वाहने याला १७ जूनला दुपारनंतर ताब्यात घेण्यात आले. सध्या त्याच्यावरूद्ध पवनी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे. आरोपीच्या घराचीही झडती घेतली जात आहे.

Web Title: Demand for Rs 10,000 to avoid deportation proceedings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.