परसोडी बिटात आढळला वाघाचा कुजलेला मृतदेह, विषबाधेचा संशय
By युवराज गोमास | Updated: March 26, 2023 19:20 IST2023-03-26T19:20:39+5:302023-03-26T19:20:47+5:30
मागच्या दोन्ही पायाची नखे गायब, कोका अभयारण्यातील घटना

परसोडी बिटात आढळला वाघाचा कुजलेला मृतदेह, विषबाधेचा संशय
भंडारा : कोका वन्यजीव अभयारण्यातील परसोडी बिटात एका सात ते आठ वर्षीय नर वाघाचा नाल्यातील पाण्यात उबळया स्थितीत मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे वाघाच्या मागील दोन्ही पाय मोडलेली असून नखे गायब होती. तीन दिवसांपूर्वीच या वाघाचा मृत्यू विषबाधेने झाल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.
कोका वन्यजीव अभयारण्यातील कर्मचारी गस्तीवर असताना परसोडी बिटातील नाल्यातील पाण्यात वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती होताच कोका अभयारण्याचे क्षेत्रसहाय्यक एम. एम. माकडे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळापासून खुर्शीपार व उसगाव ही दोन्ही गावे चार ते पाच किमी अंतरावर आहेत.
वाघाच्या समोरील दोन्ही पायांना कोणत्याही जखमा नाहीत. मात्र मागचे दोन्ही पाय मोडलेली होती. शिवाय नखे पण गायब होती. लाखनीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. गुणवंत भडके तसेच डॉ. लता देशमुख यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर त्याच परिसरात वाघावर दाहसंस्कार करण्यात आले. घटनास्थळी वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी भेट देत पाहणी केली. तपास कोका वन्यजीव अभयारण्याचे अधिकारी करीत आहेत.
पूर्ण वाढ झालेल्या मृत नर वाघाची मागची दोन्ही पाय मोडलेली होती. तसेच दोन्ही पायांची नखे गायब होती. तीन दिवसापूर्वीच विषबाधेने वाघाचा पाणी पिताना मृत्यू झाला असावा, असा कयास व्यक्त करण्यात आला आहे. मात्र ही विषबाधा साप चावल्याने अथवा शेतशिवारातील विषारी औषधाने झाला, याचा उलगडा फॉरेन्सिक अहवाल प्राप्तीनंतरच होईल..- डॉ. गुणवंत भडके, पशुधन विकास अधिकारी लाखनी.