रेशन दुकानात बायोमेट्रिक सेवा बंद; लाभार्थ्यांमध्ये असंतोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 14:42 IST2024-08-01T14:39:56+5:302024-08-01T14:42:42+5:30
Bhandara : तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन

Biometric services in ration shops stopped; Dissatisfaction among beneficiaries
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना शासन दर महिन्याला रेशन दुकानातून मोफत धान्य वाटप करते, मात्र या महिन्यातही ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबांना धान्यापासून वंचित रहावे लागत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे बायोमेट्रिक मशीन काम करत नाही. तांत्रिक अडचणी असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.
प्रशासनाने मशीनमध्ये असलेला दोषाचे निवारण करून जनतेच्या समस्या सोडविण्याकरिता राशन दुकानदार संघटनेतर्फे अध्यक्ष सुनील जग्या यांच्या नेतृत्वात तहसीलदार नीलेश कदम यांना निवेदन देण्यात आले.
रेशन दुकानांमध्ये धान्य वितरणासाठी सरकारने बायोमेट्रिक प्रणाली लागू केली आहे. परंतु, ही बायोमेट्रिकप्रणाली रेशन दुकानदार आणि ग्राहकांसाठी कायम अडचणीची ठरत आहे. शिधापत्रिकाधारकांना बायोमेट्रिक अंगठा घालणे बंधनकारक करण्यात आले. थंब लावण्यासाठी ३१ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती. पण, गेल्या पाच ते सहा दिवसांपासून यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे संपूर्ण रेशन दुकानांचे कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात कॅरी फॉरवर्डची सुविधा उपलब्ध करून द्यावी, या मागणीचे निवेदन साकोली तहसील स्वस्त धान्य दुकानदार यूनियनतर्फे तहसीलदार नीलेश कदम यांना देण्यात आले. यावेळी राशन दुकानदार संघटनेचे सुनील जगिया, सचिव मनोहर लंजे, सखाराम इचरी, राजू मरसकोले, निशिकांत समरीत, कोमल हातझाडे, बाळू रहांगडाले, आशिष बोरकर, निर्मला भालेकर, सुनीता खंडाते, लता बोरकर, विमल मेश्राम, घनश्याम शेंडे, नरेश नागरीकर, विलास बावनथडे, विनायक भेंडारकर, शेखर रामटेके उपस्थित होते.
ग्राहकांना माघारी परतावे लागते
दिवसेंदिवस रेशन दुकानावर मोठ्या प्रमाणात ग्राहक धान्य आणण्यासाठी येत असून त्यांना परत जावे लागत आहे, तर नुकतीच शेतीची कामे सुरू झाली आहेत, त्यामुळे मजुरांना पुन्हा पुन्हा माघारी जावे लागत असल्याने दुकानदार व ग्राहकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. आपापसात संघर्ष. मात्र धान्य न मिळाल्याने ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.