विद्यार्थ्यांनंतर जिल्ह्यातील ६,९५२ ज्येष्ठ निरक्षर देणार मूल्यमापन चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 15:28 IST2025-03-21T15:27:48+5:302025-03-21T15:28:10+5:30
Bhandara : पायाभूत साक्षरता, संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी

After students, 6,952 senior illiterates in the district will take the assessment test
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात केंद्र पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी शिक्षण संचालनालय (योजना) विभागामार्फत रविवार, २३ मार्च रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी उल्लास अॅपवर नोंदविलेल्या १५ वर्षे व त्याहून अधिक वयोगटातील ६,९५२ निरक्षर प्रविष्ठ होणार आहेत.
या परीक्षेच्या अनुषंगाने गुरुवारी जिल्हास्तरीय नियामक परिषद व कार्यकारी समितीच्या सदस्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, भंडाराचे प्राचार्य, रत्नप्रभा भालेराव, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रवींद्र सलामे, इतर सदस्य तसेच सर्व गटशिक्षणाधिकारी यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांच्या सभा कक्षात घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील १०० टक्के निरक्षरांनी मूल्यमापन चाचणी परीक्षेला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत भंडारा जिल्ह्यात ६,९५२ निरक्षरांची उल्लास अॅपवर ऑनलाइन नोंदणी करण्यात आली असून, या कार्यक्रमासाठी जिल्हा नियामक परिषदेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा कार्यकारी समितीचे अध्यक्ष, जिल्हा परिषद सीईओ मिलिंदकुमार साळवे, शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के सहकार्य करीत आहेत.
२,५३९ पुरुष व ४,४१३ महिला देणार परीक्षा
- पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी परीक्षेसाठी जिल्ह्यात २,५३९ पुरुष व ४,४१३ महिला अशा एकूण ६,९५२ निरक्षरांची नोंद उल्लास अॅपवर सर्वेक्षणाद्वारे करण्यात आली आहे.
- त्यांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी परीक्षा २३ मार्च रोजी रविवारी सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० या वेळेत ७५२ परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे.
- एकूण ७५२ केंद्र संचालकांची नियुक्ती करण्यात आली असून, परीक्षा केंद्रांना भेट व संनियंत्रणासाठी जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या भेटीचे नियोजन करण्यात आले आहे.
- राज्यस्तरावरून जिल्हा परीक्षा निरीक्षक म्हणून विभागीय शिक्षण उपसंचालक उल्लास नरड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परीक्षा केंद्र व परीक्षार्थी
तालुका केंद्र परीक्षार्थी
भंडारा १६० १,३४०
मोहाडी १०३ ८५४
तुमसर १२८ १,२७५
साकोली ६२ ७८६
लाखनी ८८ ७८८
लाखांदूर ७७ ९१२
पवनी १३४ ९९७
"या शाळेतून उल्लास अॅपवर १५ वर्षे व पुढील वयोगटातील निरक्षर व्यक्तींची नोंदणी झाली आहे, ती शाळा परीक्षा केंद्र असणार आहे. निरक्षरांनी परीक्षेसाठी येताना स्वतःचा पासपोर्ट साइज फोटो मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, बँक पासबुक असे एक ओळखपत्र सोबत आणावे. गैरप्रकाराविना सुरळीत पार पाडण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत."
- रवींद्र सोनटक्के, शिक्षणाधिकारी (योजना), जिल्हा परिषद, भंडारा