धान पीक पाहणीकरिता प्रशासकीय चमू शेतशिवारात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 11:24 IST2024-09-13T11:24:04+5:302024-09-13T11:24:41+5:30
Bhandara : शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांच्यावर नुकसान

Administrative team at Shetshiwar for paddy crop inspection
मुखरू बागडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : दोन दिवसांच्या अतिवृष्टीमुळे व निम्न चुलबंद प्रकल्पातील पाणी चुलबंद नदीला सोडल्याने पालांदूर परिसरातील चुलबंद खोऱ्यात दोन दिवस पूरस्थिती होती. तिसऱ्या दिवशीसुद्धा काही शेतात पुराचे पाणी आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक नेस्तनाबूद ठरण्याची शक्यता दाट आहे. त्या अनुषंगाने तहसीलदार लाखनी यांचे आदेशानुसार तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांची जमु चुलबंद खोऱ्यात थेट बांधावर निरीक्षण करीत आहे.
पालांदूर परिसरातील मन्हेगाव, वाकल, ढिवरखेडा, पाथरी, नरव्हा, लोहारा, खराशी, खुणारी, विहीरगाव पळसगाव, खोलमारा, तई गोंदी, पालांदूर आदी गावातील शेतकऱ्यांचे पुरामुळे मोठे नुकसान झाले. गर्भावस्थेतील धान पुरात डुबल्याने व त्यावर गाळ बसल्याने धान पीक समस्येत आले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अधिकारी तपासणी करीत आहेत. किती हेक्टर क्षेत्रफळाचे नुकसान झाले त्याचा अचूक अंदाज प्रशासनाच्या वतीने घेणे सुरू आहे. प्रभावित शेतकरीसुद्धा त्यांच्या सोबतीला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दयनीय अवस्था सर्वांनाच चिंतेत टाकणारी आहे. खरीप हंगामाचा संपूर्ण खर्च अंतिम टप्प्यात असून येत्या पंधरा दिवसांत हंगाम घरात येण्याची शाश्वती असताना निसर्ग कोपला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरची चिंता पुन्हा वाढली आहे. आधीच सरकारने पीक कर्जाचे प्रोत्साहन पर पन्नास हजार रुपयांपर्यंतची रक्कम शेतकऱ्यांना पुरवलेली नाही. कर्ज काढून पुन्हा हंगाम कसला. मात्र निसर्गाच्या रुद्र अवताराने शेतकरी संकटात आला. शासनानेसुद्धा तत्परतेने शेतकऱ्यांची व्यथा लक्षात घेता लवकरात लवकर नुकसान भरपाई देऊन पीक विम्याचासुद्धा लाभ लाभार्थ्यांना मिळावा. अशी अपेक्षा प्रभावित शेतकऱ्यांनी केली आहे.
"माझे धान गर्भावस्थेत आहे. तिसऱ्या दिवशीसुद्धा पुराचे पाणी बांध्यात साचले आहे, दोन दिवस संपूर्ण धान पुराच्या पाण्याखाली होते. त्यावर पुराची गाळ सुद्धा बसली आहे. त्यामुळे पीक सडण्याची पूर्ण शक्यता दिसत आहे. शासनाने व प्रशासनाने झालेल्या नुकसानीचा शंभर टक्के परतावा द्यावा."
- भगवान शेंडे, प्रभावित शेतकरी, महेगाव.
"शेतशिवारात नुकसानग्रस्त भागाचा सर्वे सुरू असून ३३ टक्क्यांच्या वर नुकसान दिसत आहे. प्रभावित शेतकरीसुद्धा सोबतीला आहेत. गुरुवारला मन्हेगाव येथे सर्वे सुरू आहे. दररोजची माहिती वरिष्ठ स्तरावर दिली जात आहे."
- सुनील कासराळे, तलाठी, पालांदूर.