फरार डॉ. देवेश अग्रवालची अखेर न्यायालयात शरणागती
By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: July 29, 2025 15:01 IST2025-07-29T15:00:43+5:302025-07-29T15:01:42+5:30
अल्पवयीन मुलीवर सोनोग्राफी कक्षात अनैतिक कृत्य केल्याचा आरोप : २० दिवसांपासून होता फरार

Absconding Dr. Devesh Agarwal finally surrenders in court
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवरील अश्लील वर्तनाप्रकरणी अखेर आरोपी डॉक्टर देवेश अग्रवाल याने भंडारा न्यायालयात सोमवारी, २८ जुलैला सायंकाळी आत्मसमर्पण केले. मागील २० दिवसांपासून तो फरार होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केला होता.
९ जुलै रोजी साकोलीतील श्याम हॉस्पिटलमध्ये घडलेल्या घटनेत पीडित मुलगी आईसोबत उपचारासाठी आली असताना डॉक्टर देवेश अग्रवाल याने सोनोग्राफीच्या नावाखाली आई व परिचारिकेला बाहेर पाठवले. त्यानंतर एकांतात मुलीसोबत अश्लील वर्तन करत मोबाईल क्रमांक मागितला आणि गुप्तता राखण्याची धमकी दिली, असे पीडितेच्या तक्रारीत नमूद आहे. डॉक्टरने याआधीही पीडितेला इंस्टाग्रामवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती, हे सुद्धा तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. रुग्णालयातून बाहेर पडल्यावर मुलीने आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला आणि यावरून पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणात डॉ. देवेश अग्रवाल याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ६४ (२)(क), ६५ (१), बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत कलम ४, ६, ८ आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ३(२)(५) अन्वये गुन्हा दाखल झाला. आरोपीला मदत केल्याप्रकरणी त्याचा भाऊ भरत अग्रवाल व जितेश अग्रवाल यांनाही आरोपी करण्यात आले होते.
फरार आरोपीच्या शोधासाठी जिल्हा पोलीस दलाने विशेष ७ पथके स्थापन करून गोंदिया, अमरावती, पुणे, नागपूर, मुंबई ते हैदराबादपर्यंत शोध मोहीम राबवली होती. लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती, तर वायरलेस संदेशाद्वारे देशभरातील पोलिसांना सतर्क करण्यात आले होते.
आरोपीच्या पीसीआरची मागणी
भंडारा पोलिसांनी न्यायालयाकडे आरोपीच्या पोलिस कोठडीची मागणी केली आहे. या प्रकरणातील अनेक महत्वाचे तपास करायचे असल्याचे डॉ. देवेश अग्रवाल याला ताब्यात देण्याची मागणी करणारा अर्ज पोलिसांनी न्यायालयाकडे केला आहे.