पुराच्या पाण्यात पुलावरून पिक अप उलटला, दोन लहान मुली गेल्या वाहून
By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: September 27, 2024 12:39 IST2024-09-27T12:34:02+5:302024-09-27T12:39:01+5:30
पहाटेची घटना : महिला पुरुषांसह १८ व्यक्ती बचावले; भजनाच्या कार्यक्रमावरून निघाले होते गावाकडे

A pick-up overturned from a bridge in floodwaters, sweeping away two little girls
साकोली (भंडारा) : साकोली तालुक्यातील जांभळी गावाजवळ पहाटे ५ वाजता नाल्याच्या पुलावरून पिक अप वाहून गेला. त्यामधून प्रवास करणाऱ्या गावकऱ्यांसोबत असणाऱ्या दोन लहान मुली प्रवाहात वाहून गेल्या. नव्या इंद्रराज वाघाळे (८ वर्ष) आणि प्रियांशी मोरेश्वर वाघाडे (४ वर्ष) अशी त्या मुलींची नावे आहेत.
हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील भीवखिडकी (ता. मोरगाव अर्जूनी) या गावामध्ये असलेल्या भजनासाठी खांबा (वडेगाव) येथील गावकरी रात्री १० वाजताच्या सुमारास एमएच १२ / ७१७३ क्रमांकाच्या एका पिक अप वाहनातून गेले होते. रात्री जेवणानंतर भजनाचा कार्यक्रम आटोपून पहाटेच हे सर्वजण पिक अप वाहनातून गावाकडे निघाले होते. वाहनात महिला आणि पुरुषांसह २० व्यक्ती होते.
साकोलीपासून ११ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जांभळी गावालगतच्या नाल्यावरील पुलावरून सुमारे २ फुट पाणी वाहत होते. मात्र चालकाने प्रवाहाचा अंदाज न घेता वाहन घातले, परिणामत: नियंत्रण सुटल्याने ते पुलावरून उलटले. या दुर्घटनेमध्ये दोन लहान मुली वाहून गेल्या. अपघात घडत असल्याचे लक्षात घेताच वाहनातील नागरिकांनी बचावासाठी प्रचंड आरडाओरड केली. लागूनच गाव असल्याने हा आवाज ऐकून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली असता नाल्यात वाहन पडलेले दिसले. गावकऱ्यांनी बचावकार्य करून वाहनातून महिला आणि पुरूषांना बाहेर काढले. मात्र दोन मुली हाती लागल्या नाही. गावकऱ्यांनी साकोली पोलिसांना कळविल्यावर पोलिसांनीही धाव घेतली. वाहून गेलेल्या मुलींचा शोध सुरू आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसिलदार यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली.
रात्रीच्या पावसाने केला घात
रात्री १० वाजता भजनासाठी जाताना नाल्यावर पाणी नव्हते. पूरही नव्हता. रात्री या परिसरात पाऊस आला. त्यामुळे पूर आला. मात्र चालकाला प्रवाहाचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्याने वाहन पुलावरून घातले आणि ही दुर्घटना घडली.