तुमसर तालुक्यातील ७,०३८ निराधारांना सहा महिन्यांपासून अनुदान मिळालेच नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 14:29 IST2025-05-13T14:25:02+5:302025-05-13T14:29:11+5:30
Bhandara : आधारकार्ड अपडेट केल्यानंतरच अनुदान जमा

7,038 destitute people in Tumsar taluka have not received any money for six months
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत ७०३८ लाभार्थ्यांचे अनुदान आधारकार्ड अपडेट न झाल्याने मागील सहा महिन्यांपासून रखडल्याची माहिती आहे. केवळ ३,१६२ लाभार्थ्यांना मार्च २०२५ पर्यंत अनुदान त्यांच्या खात्यावर जमा झाले आहे. त्यामुळे लाभार्थीत प्रचंड असंतोष दिसत आहे. गतिमान शासनात कासवगतीने कामे कसे सुरू आहेत, असा प्रश्न तो उपस्थित होतो.
संजय गांधी निराधार अनुदान व श्रावणबाळ राज्य निवृत्तिवेतन योजनेचे पैसे डीबीटीद्वारे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु, तुमसर तालुक्यात मागील सहा महिन्यांपासून लाभार्थ्यांचे अनुदान रखडल्याने फटका बसत आहे. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात लाभार्थ्यांना औषधोपचार व इतर कामाकरिता नियमित अनुदान मिळण्याची व्यवस्था शासनाने करावी, अशा भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या. परंतु, त्याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.
एकूण लाभार्थी १०,२००; ३,१६२ लाभार्थ्यांना अनुदान
तुमसर तालुक्यात लाभार्थ्यांची संख्या १० हजार २०० आहे. त्यापैकी ७ हजार ८४१ लाभार्थी डीबीटी ऑनबोर्ड झाले आहेत, अशी माहिती तहसील कार्यालयामार्फत देण्यात आली. ३ हजार १६२ लाभार्थ्यांना माहे मार्च २०२५ पर्यंत डीबीटीद्वारे अनुदान त्यांच्या खात्यात जमा झाले असल्याचे पोर्टलवर दिसून येत आहे. ७ हजार ३८ लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे.
आधारकार्ड अपडेटची प्रक्रिया सुरू
लाभार्थ्यांचे आधारकार्ड अपडेटची कारवाई सुरू आहे. आधारकार्ड अपडेट झाल्यानंतरच खात्यात डीबीटीद्वारे अनुदान जमा होईल, अशी माहिती तहसील कार्यालयाने कळविली आहे.
"संजय गांधी, इंदिरा गांधी व श्रावणबाळ लाभार्थ्यांची थट्टा शासनाकडून सुरू आहे गतिमान शासन असल्यानंतरही येथे अनुदान लाभार्थ्यांना सहा महिन्यापासून मिळत नाही. शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता लाभार्थ्यांसोबत तीव्र आंदोलन करण्यात येईल."
- चरण वाघमारे, माजी आमदार, तुमसर