श्री स्वामी समर्थ प्रकट दिन: ‘असे’ करा पूजन, काय कराल अर्पण? स्वामी होतील प्रसन्न, शुभ घडेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 14:09 IST2025-03-30T14:06:39+5:302025-03-30T14:09:19+5:30
Shree Swami Samarth Prakat Din 2025: ३१ मार्च २०२५ रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन आहे. या दिवशी स्वामींचे पूजन कसे करावे? सोपी पद्धत जाणून घ्या...

श्री स्वामी समर्थ प्रकट दिन: ‘असे’ करा पूजन, काय कराल अर्पण? स्वामी होतील प्रसन्न, शुभ घडेल
Shree Swami Samarth Prakat Din 2025: ३१ मार्च २०२५ रोजी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आहे. श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने अक्कलकोटसह जिथे स्वामींचे मठ आहेत, स्वामींची मंदिरे आहेत, तिथे विशेष पूजन विधी, धार्मिक कार्यक्रम, उपासना, नामस्मरण केले जाते. स्वामी भक्तही स्वामी नामात आणि स्वामी स्वरुपात तल्लीन होऊन जातात. या दिवशी शक्य तेवढी स्वामींची सेवा करण्याकडे भाविकांचा अधिक कल असतो. दररोज, नित्यनेमाने, नियमितपणे स्वामींची सेवा करणारे लाखो भक्त असतात. परंतु, प्रकट दिनाचे औचित्य साधून विशेषत्वाने स्वामींची सेवा केली जाते. अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने स्वामींची पूजा करता येऊ शकते. स्वामी पूजनाची सोपी पद्धत, नेमके काय अर्पण करावे, ते जाणून घेऊया...
चैत्र शुद्ध द्वितीय हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन मानला जातो. यंदा २०२५ ला सोमवार, ३१ मार्च रोजी स्वामींचा प्रकट दिन आहे. खो भाविक अक्कलकोटला जाऊन आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतात. स्वामींसमोर लीन होतात. स्वामींची कृपा लाभावी यासाठी स्वामी सेवा करतात. केवळ अक्कलकोट नाही, तर जिथे-जिथे स्वामींचे मठ आहेत, तिथे-तिथे भाविक मोठ्या प्रमाणात जाऊन स्वामींसमोर नतमस्तक होतात. परंतु, विशेष संकल्प करून स्वामींची सेवा करणे शक्य झाले नाही, तरी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींचे पूजन करावे, असे सांगितले जाते.
श्री स्वामी समर्थ प्रकट दिनी कशी करावी पूजा?
सर्वप्रथम सकाळी लवकर उठून नित्यकर्मे आटोपून शूचिर्भूत व्हावे. ज्या ठिकाणी पूजा करणार आहात, ती जागा स्वच्छ करून घ्यावी. एका चौरंगावर स्वामींची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापन करावी. त्यानंतर स्वामी पूजनाचा संकल्प करावा. स्वामींचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे स्वामींना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून स्वामींची आरती करावी. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास स्वामींची स्तोत्रे, श्लोक, मंत्रांचे जप करावेत. यथाशक्ती दान करावे. आपापले कुळाचार, कुळधर्म, परंपरा यानुसार पूजन करावे. षोडषोपचार पूजा शक्य नसेल, तर पंचोपचार पूजा करावी. विशेष म्हणजे स्वामींना आवडतील अशी फुले अर्पण करावीत. स्वामींच्या आवडीचे पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करावेत. भक्तिभावाने स्वामींची पूजा करा. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पिवळ्या रंगाचा समावेश असलेली फुले, गोडाचा पदार्थ, पिवळ्या रंगाची मिठाई आवर्जून स्वामींना अर्पण करावी. किमान १०८ वेळा 'श्री स्वामी समर्थ' या मंत्राचा जप करावा. १०८ वेळा शक्य नसेल, तर शक्य आहे, तितका जप करावा.
स्वामींच्या लीला अगाध आहेत. स्वामींचा थांग कोणालाही लागू शकत नाही. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील, हेही कोणी सांगू शकत नाही. परंतु, जेव्हा कृपा होते, शुभाशिर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते. म्हणूनच स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा. स्वामी नक्कीच शुभ करतील, अशी अढळ श्रद्धा कायम ठेवा. स्वामी महाराजांप्रति केवळ नम्र, शरणागत आणि समर्पण भाव ठेवा. स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण, स्वामी सेवा करत राहा.
॥ श्री स्वामी समर्थ ॥