श्री स्वामी समर्थ प्रकट दिन: पूजन झाल्यावर आवर्जून म्हणा आरती, प्रदक्षिणा, मंत्र पुष्पांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 14:52 IST2025-03-30T14:44:23+5:302025-03-30T14:52:44+5:30

Shree Swami Samarth Prakat Din 2025: स्वामींचे पूजन झाल्यावर स्वामींच्या विविध आरत्या, प्रदक्षिणा आणि मंत्र पुष्पांजली आवर्जून म्हणावी, असे सांगितले जाते. 

shri swami samarth maharaj prakat din 2025 after puja vidhi recite the shree swami samarth maharaj aarti pradakshina mantra pushpanjali | श्री स्वामी समर्थ प्रकट दिन: पूजन झाल्यावर आवर्जून म्हणा आरती, प्रदक्षिणा, मंत्र पुष्पांजली

श्री स्वामी समर्थ प्रकट दिन: पूजन झाल्यावर आवर्जून म्हणा आरती, प्रदक्षिणा, मंत्र पुष्पांजली

Shree Swami Samarth Prakat Din 2025: चैत्र शुद्ध द्वितीय हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन मानला जातो. ३१ मार्च २०२५ रोजी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आहे. श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने अक्कलकोटसह जिथे स्वामींचे मठ आहेत, स्वामींची मंदिरे आहेत, तिथे विशेष पूजन विधी, धार्मिक कार्यक्रम, उपासना, नामस्मरण केले जाते. स्वामी भक्तही स्वामी नामात आणि स्वामी स्वरुपात तल्लीन होऊन जातात. या दिवशी शक्य तेवढी स्वामींची सेवा करण्याकडे भाविकांचा अधिक कल असतो. स्वामींचे पूजन झाल्यावर स्वामींच्या विविध आरत्या, प्रदक्षिणा आणि मंत्र पुष्पांजली आवर्जून म्हणावी, असे सांगितले जाते. 

श्री स्वामी समर्थ आरती हे एक साधन नसून, त्यांच्या भक्तांनी त्यांच्या आराध्याला आदराने स्मरण करण्याची व प्रेमाची प्रतिमा आहे. आरतीचे महत्त्व प्राचीन आहे. आरतीने भक्तांना त्यांच्या आराध्याच्या सानिध्यात आणि दिव्यत्वात आत्मीय अनुभव करण्याची संधी देते. अक्कलकोट स्वामी समर्थ यांच्या आरतीने भक्तांना आत्मिक शांतता, संतोष आणि ध्यान प्रदान करते, असे मानले जाते. 

श्री स्वामी समर्थ महाराज आरती - १

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!

छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसी
भक्त वत्सल खरा तू एक होसी, म्हणूनी शरण आलो तुझिया चरणांसी !! जयदेव जयदेव..!!

त्रैगुण परब्रम्ह तुझा अवतार, याची काय वर्णू लीला पामर
शेषादीक शिणले नलगे त्या पार,तेथे जडमूढ कैसा करु विस्तार !! जयदेव जयदेव..!!

देवाधिदेव तू स्वामीराया, निर्जर मूनिजन ध्याती भावे तव पाया
तुजसी अर्पण केली आपली ही काया,शरणागता तारी तू स्वामीराया !! जयदेव जयदेव..!!

अघटित लीला करुनी जडमूढ उध्दरीले,किर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे.
चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले, तुझ्या सूता नलगे चरणावेगळे !! जयदेव जयदेव..!!

स्वामी समर्थ महाराजांची आरती - २

जय देव जय देव, जय जय अवधूता, हो स्वामी अवधूता।
अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता।। जय देव जय देव॥धृ॥

तुमचे दर्शन होता जाती ही पापे।
स्पर्शनमात्रे विलया जाती भवदुरिते।
चरणी मस्तक ठेवूनि मनि समजा पुरते।
वैकुंठीचे सुख नाही या परते।।
जय देव जय देव॥१॥

सुगंध केशर भाळी वर टोपी टिळा।
कर्णी कुंडल शोभति वक्षस्थळी माळा।
शरणागत तुज होतां भय पडले काळा।
तुमचे दास करिती सेवा सोहळा।। जय देव जय देव॥२॥

मानवरुपी काया दिससी आम्हांस।
अक्कलकोटी केले यतिवेषे वास।
पूर्णब्रम्ह तूची अवतरलासी खास।
अज्ञानी जीवास विपरीत भास।। जय देव जय देव॥३॥

र्निगुण र्निविकार विश्वव्यापक।
स्थिरचर व्यापून अवघा उरलासी एक।
अनंत रुपे धरसी करणे नाएक।
तुझे गुण वर्णिता थकले विधीलेख।।
जय देव जय देव॥४॥

घडता अनंत जन्मे सुकृत हे गाठी।
त्याची ही फलप्राप्ती सद्-गुरुची भेटी।
सुवर्ण ताटी भरली अमृत रस वाटी।
शरणागत दासावर करी कृपा दृष्टी।।
जय देव जय देव॥५॥

श्री स्वामी समर्थ आरती - ३

जय जय सद्-गुरु स्वामी समर्था,
आरती करु गुरुवर्या रे।
अगाध महिमा तव चरणांचा,
वर्णाया मति दे यारे ॥धृ॥
 
अक्कलकोटी वास करुनिया,
दाविली अघटित चर्या रे।
लीलापाशे बध्द करुनिया,
तोडिले भवभया रे ॥१॥
 
यवन पूछिले स्वामी कहॉ है,
अक्कलकोटी पहा रे।
समाधी सुख ते भोगुन बोले,
धन्य स्वामीवर्या रे ॥२॥
 
जाणिसे मनीचे सर्व समर्था,
विनवू किती भव हरा रे।
इतुके देई दीनदयाळा,
नच तव पद अंतरा रे ॥३॥

श्री स्वामी समर्थ महाराज आरती - ४

आरती स्वामी राजा।
कोटी आदित्यतेजा। तु गुरु मायबाप।
प्रभू अजानुभुजा। आरती स्वामी राजा॥धृ॥
 
पुर्ण ब्रम्ह नारायण।
देव स्वामी समर्थ। कलीयुगी अक्कलकोटी।
आले वैकुंठ नायक। आरती स्वामी राजा ॥
 
लीलया उद्धरिले।
भोळे भाबडे जन। बहुतीव्र साधकासी।
केले आपुल्या समान। आरती स्वामी राजा ॥
 
अखंड प्रेम राहो। 
नामी ध्यानी दयाळा। सत्यदेव सरस्वती। 
म्हणे आम्हा सांभाळा। आरती स्वामी राजा॥३॥

स्वामी समर्थ महाराज आरती प्रदक्षिणा

धन्य तारक प्रदक्षणा या श्रीगुरुरायाची ।। आवड झाली भक्तजनाला भव उतरायाची ।। धृ।। 

प्रदक्षणा करितां दुरित भार हा जाळी ।। एक एक पाऊली कोटी तीर्थे आंघोळी ।।१।। 

कोटीकोटी अश्वमेध एक पाउली ।। स्वामिनाम मुखी गाता गाता पुण्याची ही बोली ।। २ ।। 

कोटी कन्यादान शतकोटी या कपिला ।। मेरुतुल्य कांचन देतां भार नसे पाउला ।।३।। 

दगड पाषाण तरुवर तरती जाणा ज्या नामे ।। पदोपदी हे पुण्यची भारी तुटली भवभ्रमे ।।४।। 

भूत पिशाच्च समंध जाती प्रदक्षणा केल्या ।। बहात्तर रोग कर जोडीती तीर्थे सेवील्या ।।५।। 

देवादिक हे कर जोडीती जाणा तद्भक्ता ।। प्रदक्षणा ही करितां भावे नाही कधी चिंता ।। ६ ।। 

पूर्वज तरती नाकी जाती होती सुखरूप ।। स्वामिनाम प्रदक्षणे कार्य साधे नको जपतप ।।७।। 

म्हणुनी जना हे सांगतसे मी निज सुख जाणा ।। स्वामी आनंदनाथ हा करुणा वचने बोधितसे मना ।।८।।

श्री स्वामी समर्थ मंत्र पुष्पांजली

पूर्ण ब्रह्मा सनातना विभुवरा निर्गुण सर्वेश्वरा।
ओंकाराकारा परात्परा गुरो आम्हा तुझा आसरा।।
मूलाधार जगतप्रभू तुझी लीला न जाणे कुणी।
देवा विघ्न हरी आम्हावरि करी, आडो न माया गुणी॥१॥

आनंदकंद विमला ज्ञानस्वरुपा।
साक्षी सदैव हृदयस्थ ही मायबापा।।
स्वामी समर्थ गुरु तू हरी सर्व तापा।
दावि स्वरूप मज लावूनी ज्ञानदीपा॥२॥

धर्मग्लानि कराल काल कली हा शास्ता नुरे या मही।
तत्वाचा लव मागमूस न दिसे धुंडूनि सत्वातहि।।
भक्ता न्याय प्रमत्त दंड करण्या येई विजयदत्त हा।
होई लीन अनन्यभावे चरणी वंदी सदा दास हा॥३॥

विधीहरिहर हे एकरूपे मिळाले।
परमगुरुस्वरूपे देखता नेत्र घाले।।
अनुपम तव प्रीती लीन होताती भक्तं।
तव पद झणि देशी धन्य तू एक दत्त॥४॥

परमात्मा पुरूषोत्तमा गुणतिये नारायणा श्रीधरा।
लीलाविग्रही सूत्रधार हृदयी राहुनिया आचरा।।
ज्ञाते भाव सरो सदैव विसरो हा जीव तो दुसरा।
अर्पितसे सुमनांजली तव पदा प्रेमे जगतगुरुवरा॥५॥

ब्रह्मा इंद्र सुरासुर प्रतिदिनी प्रार्थित तुझिया पदा।
ओंकारस्वरूपा तू वेद जननी दुरवी न आम्हा कदा।।
भावे ज्या भजता भिउनि पळती दैन्यादि सर्वापदा।
गायत्री सुमने नमू करी कृपा आम्हावरी सर्वदा॥६॥

- याशिवाय तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या माहिती असलेल्या आरत्या आवर्जून म्हणाव्यात. श्लोक, स्तोत्रांचे पठण वा श्रवण आवर्जून करावे.

।। श्री स्वामी समर्थ ।।

 

Web Title: shri swami samarth maharaj prakat din 2025 after puja vidhi recite the shree swami samarth maharaj aarti pradakshina mantra pushpanjali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.