गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 16:34 IST2025-08-16T16:31:01+5:302025-08-16T16:34:52+5:30

Shree Ganesh Chaturthi 2025 Date Shubh Muhurat: यंदा २०२५ला गणेशोत्सव कधीपासून सुरू होणार? श्रीगणेश चतुर्थीला राहु काळ कधी आहे? जाणून घ्या...

shree ganesh chaturthi 2025 know about date shubh muhurat vrat significance with some beliefs of ganeshotsav 2025 | गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता

गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता

Shree Ganesh Chaturthi 2025 Date Shubh Muhurat: मराठी वर्षातील महत्त्वाचा चातुर्मास काळ सुरू आहे. चातुर्मासातील अनन्य साधारण महत्त्व असलेला व्रत वैकल्यांचा राजा मानला गेलेला श्रावण महिना सुरू आहे. श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जयंती आणि गोपाळकाला झाल्यानंतर सर्वांनाच उत्सुकता लागते ती अबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची. खरे पाहता श्रावण सुरू झाला की गणपतीची लगबग सुरू होते; परंतु, श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर या तयारीला अधिक वेग येतो. गणपती बाप्पाच्या केवळ नामस्मरणाने सकारात्मकता येते. एका चैतन्यमय उर्जेचा संचार होतो. महादेव आणि पार्वती देवींचा पुत्र गणेश प्रथमेश मानला गेला आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना प्रथम गणपती स्मरण केले जाते. यंदा २०२५ मध्ये श्रीगणेश चतुर्थी कधी आहे? गणेशोत्सव कधीपासून सुरू होणार? जाणून घेऊया...

अगदी काही दिवसांनी चातुर्मासातील भाद्रपद महिना सुरू होईल. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्रीगणेश चतुर्थी असते. त्यापूर्वी तृतीयेला हरतालिकेचे पूजन केले जाते. भाद्रपद महिना म्हटला की, केवळ आणि केवळ आठवतो तो गणेशोत्सव. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, १४ विद्या आणि ६४ कला अधिपती असलेल्या गणेशाचे पूजन या महिन्यात केले जाते. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी घराघरात पार्थिव गणेशाची स्थापना केली जाते. गणपती हा समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा समाजाच्या सर्व थरांना, सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. 

श्रीगणेश चतुर्थी: बुधवार, २७ ऑगस्ट २०२५

भाद्रपद शुद्ध चतुर्थी प्रारंभ: मंगळवार, २६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ०१ वाजून ५४ मिनिटे.

भाद्रपद शुद्ध चतुर्थी समाप्ती: बुधवार, २७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ०३ वाजून ४३ मिनिटे.

राहु काळ: बुधवार, २७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजता ते दुपारी १ वाजून ३० मिनिटे.

भारतीय पंचांगानुसार, आपल्याकडे सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे श्रीणेश चतुर्थी, गणपती प्राणप्रतिष्ठा पूजा बुधवार, २७ ऑगस्ट २०२५ रोजी करावे, असे सांगितले जात आहे. २७ ऑगस्ट २०२५ पासून गणेशोत्सव सुरू होणार आहे. शनिवार, ०६ सप्टेंबर २०२५ रोजी अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी गणेशोत्सवाची सांगता होईल. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. विविध कलांच्या अविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच देवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो.

पार्थिव गणपती पूजनाची प्राचीन परंपरा

प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध चतुर्थी सिद्धिविनायकी चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. तर भाद्रपद महिन्यात येणारी शुद्ध चतुर्थी महासिद्धिविनायकी चतुर्थी मानली जाते. ही चतुर्थी रविवारी किंवा मंगळवारी आल्यास तिचे महात्म्य अधिक असते. याच तिथीला वरद चतुर्थी किंवा शिवा असेही म्हटले जाते. या दिवशी पार्थिव गणेशाची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे. भाद्रपद चतुर्थीला गणपतीची स्थापना करून अनंत चतुर्दशीला विसर्जन केले जाते. गणेश चुतर्थी दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध मानले गेले आहे. या दिवशी चंद्रदर्शन केल्यास चोरीचा आळ येतो. श्रीकृष्णावर या दिवशी घडलेल्या चंद्रदर्शनाने स्यमंतक मणी चोरल्याचा आळ आला होता, अशी मान्यता आहे.

गुणेशाचा जन्म अन् श्रीगणेश चतुर्थीची कथा

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशोत्सव साजरा केला जातो. एका मान्यतेनुसार, श्रीगणेशाच्या अवतारांपैकी गुणेश याचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला. महादेव शिवशंकरांनी कैलास पर्वतावर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला याच दिवशी जन्मोत्सव साजरा केला. श्रीगणेशाने सिंदूर दैत्यावर विजय मिळवला, तो दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी हाच होता. त्याप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा करण्यात आला. ती पूर्वपरंपरा आजही पाळली जात आहे. चतुर्थी तिथी श्रीगणेशाची अत्यंत प्रिय तिथी आहे. चतुर्थी म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती यांपलीकडील तुरीया अवस्था होय. तेच जीविताचे परमाध्य, असे मानले जाते. थोरले माधवराव पेशवे यांनी गणेश चतुर्थीचा उत्सव सार्वजनिकरित्या शनिवार वाड्यात सुरू केला. यानंतर लोकमान्य टिळकांनी हा सार्वजनिक उत्सव समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला भव्य स्वरुप दिले.

मराठी वर्षांत गणपतीचे तीन जन्म मोठ्या उत्साहात साजरे होतात

गणपती हाच सृष्टीचा निर्माण कर्ता असल्याचे मानले जाते. तोच ब्रह्म आहे, विष्णू आहे, रुद्र आहे, इंद्र आहे, असे सांगितले जाते. महादेव शिवशंकर, भगवान विष्णू यांच्याप्रमाणे गणपतीनेही विविध अवतार धारण केल्याच्या कथा पुराणांमध्ये आढळतात. मराठी वर्षात लाडक्या गणपती बाप्पाचे तीन जन्म मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. विविध स्वरुपात गणपतीचे पूजन केले जाते. गणेशविषयक विशेष दिवस वैशाख पौर्णिमेपासून सुरू होतात, अशी मान्यता आहे. गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्त्वाचे मानले आहेत. यापैकी एक वैशाख पौर्णिमेला पुष्टिपती विनायक जन्म, भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजचे गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती.

बुधवारी केलेल्या गणपती पूजनाचे अनन्य साधारण महत्त्व

यंदा २०२५ मध्ये श्रीगणेश चतुर्थी बुधवारी येत आहे. साधारणपणे मंगळवारी गणपतीचे विशेष पूजन, नामस्मरण करण्याला प्राधान्य दिले जाते. मात्र, बुधवारी केलेल्या विशेष गणपती पूजन, भजन, नामस्मरण यालाही अनन्य साधारण महत्त्व आहे. बुधवारी गणपती पूजा झाल्यावर गणपती बाप्पाला आवडणारे जास्वदाचे एखादे फूल वाहावे. लाडू किंवा मोदक यांचा नैवेद्य दाखवावा. लाडू किंवा मोदक नसतील, तर गोडाचा नैवेद्य दाखवावा. गणपती बाप्पाला आवडणाऱ्या वस्तू, गोष्टी अर्पण केल्यास ते भाविकांसाठी शुभलाभदायक ठरू शकते. तसेच गणपतीचा ‘ॐ गं  गणपतये नम:’ हा मंत्र १०८ वेळा किंवा जितका शक्य असेल, तितक्या वेळा म्हणावा. बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे. या दिवशी २१ दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख-समृद्धी आणि बुद्धीप्रदान करतात, असे सांगितले जाते. धार्मिक पुराणांमध्ये गणपतीला बुद्धीचा देवता मानले गेले आहे. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

दरम्यान, वास्तविक पाहता मुख्य गणेश चतुर्थीचे व्रत श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत पार्थिव गणेशपूजा करावी, असे व्रत आहे. हे व्रत संपूर्ण महिनाभर करणे शक्य नसल्यास किमान भाद्रपद चतुर्थीला पार्थिव पूजा करावी, असे शास्त्र सांगते. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी गणपतीचे वाहन असलेल्या मूषकाला खिरीचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे.

॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥

 

Web Title: shree ganesh chaturthi 2025 know about date shubh muhurat vrat significance with some beliefs of ganeshotsav 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.