गणेशोत्सव : आधी मन घेई हाती, तोची गणराजा गणपती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 06:12 AM2020-08-31T06:12:11+5:302020-08-31T06:12:31+5:30

सद्गुरु वामनराव पै यांनी एका भाषणामध्ये गणपतीची महती स्पष्ट केली होती. सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवानिमित्त त्यांच्या भाषणाचा हा सारांश.

Ganeshotsav: Sadguru Shree Vamanrao pai's thought on Ganesha | गणेशोत्सव : आधी मन घेई हाती, तोची गणराजा गणपती

गणेशोत्सव : आधी मन घेई हाती, तोची गणराजा गणपती

googlenewsNext

- सद्गुरु
वामनराव पै

(जीवनविद्या मिशनचे संस्थापक)

आपल्या देशात गणेशोत्सव आपण सर्व आनंदाने साजरा करत असतो. यावेळी लोक आपापली दु:खे विसरून जातात, या दृष्टीने या उत्सवाचे महत्त्व आहेच. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला त्यामागे समाजप्रबोधन हा खरा आणि एकमेव हेतू आहे. हा हेतू लक्षात घेऊन गणेशोत्सव साजरा केला गेला तर त्याचे मांगल्य टिकून राहील. गणेशोत्सवातील कार्यक्रमांना समाजप्रबोधन ही एकच दिशा असली पाहिजे. गणपती हे विद्येचे, ज्ञानाचे, शौर्याचे, चातुर्याचे, बुद्धीचे, सामर्थ्याचे दैवत असल्यामुळे लोकमान्य टिळकांनी समाजप्रबोधनासाठी हे दैवत निवडले. पारतंत्र्य काळात धार्मिक उत्सवांच्या निमित्ताने लोक एकत्रित येतील, राष्ट्रकार्यासाठी त्यांना संघटित करता येईल यासाठी लोकमान्य टिळकांनी या उत्सवाचा चंग बांधला. लोकांना आज समाजप्रबोधनाचे महत्त्व वाटत नसल्यामुळे हा हेतू बाजूला होत असलेला दिसत आहे.

आपल्या साधुसंतांनी, ऋषिमुनींनी खरा गणपती कोण ते आधीच सांगून ठेवलेले आहे. खऱ्या गणपतीची उपासना करता यावी यासाठी या गणेशाची आपण उपासना करायची असते. ‘आधी मन घेई हाती, तोची गणराजा गणपती’ असे म्हटलेले आहे. तुमचे मन हेच खरा गणपती आहे.
या मनरूपी गणपतीला प्रसन्न करून घ्यायचे आहे. यासाठी तुकाराम महाराज असेही सांगतात की ‘मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण’. या मनाला प्रसन्न करून घेतले तरच तुमच्या जीवनातील सर्व प्रश्न सुटतील आणि जीवनात सुखच सुख असेल. भगवतगीतेत, उपनिषदांत या मनरूपी गणपतीचे महत्त्व सांगितलेले आहे. गणपती म्हणजे गणांचा पती, गुणांचा पती. आपल्या ठिकाणी असणारी कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये या सर्वांचा स्वामी गणपती आहे.

आपले जे स्वरूप आहे ते प्राप्त करून घेण्यासाठी मनरूपी गणपतीला प्रसन्न करून घेतले पाहिजे. आपल्या गणपतीच्या हातात शस्रे आहेत. त्यातून तुम्ही शूरवीर व्हा, असा संदेश तो देतो आहे. ज्याची तुम्ही भक्ती करता ते तुम्ही झाले पाहिजे याला सायुज्यता मुक्ती असे म्हणतात. गणपती बुद्धीची देवता आहे याचा अर्थ तुम्ही बुद्धिमान व्हा, ज्ञानी व्हा. गणपतीच्या चातुर्याची कथा तुम्हाला ठाऊकच आहे, त्यातून तो आपल्याला चतुर व्हा असे सांगत आहे. गणपती हे मातृभक्त होते, त्याप्रमाणे आपणही मातृभक्त असले पाहिजे.

मनरूपी गणपतीला प्रसन्न करून घेण्यासाठी स्थैर्य, शांतीचे मोदक दिले तरच हा गणपती प्रसन्न होतो. ‘शांतीपरते नाही सुख.’ शांतीरूपी मोदक मनाला मिळाला की हे प्रसन्न झालेले मन तुम्हाला तुम्ही मागाल ते देते. आज आपण मनाला काळजी, चिंता, द्वेष यांचा मोदक देत असतो. मनरूपी गणपतीचा अभ्यास केला पाहिजे.

मनरूपी गणपतीला अनिष्ट गोष्टी दिल्या की त्याचा तुमच्यावर कोप होतो. पवित्र, मंगल विचारांचा मोदक तुम्ही त्याला दिलात तर तुमच्यावर त्याच्या कृपेचा वर्षाव होतो. हे सर्व मंगल विचार आमच्या विश्वप्रार्थनेत आहे. मनरूपी गणपतीला विश्वप्रार्थनेचा मोदक द्या.

Web Title: Ganeshotsav: Sadguru Shree Vamanrao pai's thought on Ganesha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.