शूर, वीर, हुशार, ध्येयवादी, खेळकर वृत्ती तरी शीघ्रकोपी, ही वैशिष्ट्ये आहेत धनु राशीच्या लोकांची! हे लोक कुशाग्र बुद्धीचे असतात. कोणत्याही विषयाचे अवलोकन चटकन करतात, मात्र तोच विषय कोणाला समजवून सांगायची वेळ येते तेव्हा मात्र चिडचिड करतात. समजावणे आणि समजून घेणे या दोन गोष्टींचा त्यांच्याकडे अभाव असतो.
धनु राशीचे लोक गोल चेहऱ्याचे, सुदृढ देहाचे आणि स्वभावाने निर्भीड असतात. शरीर बोजड असले तरी ते चपळ असतात. आपली मते ठासून मांडतात आणि सगळ्यांनी ती मान्य करावी असादेखील त्यांचा आग्रह असतो. त्यांच्या ध्येयमार्गाच्या आड येणाऱ्या गोष्टी, व्यक्ती त्यांना आवडत नाहीत. त्यांच्याशी शत्रुत्व निर्माण झाले तरी त्यांना सुख दुःख नसते, एवढे ते ध्येयवेडे असतात.
त्यांच्याकडे उत्तम विनोद बुद्धी असते. त्यामुळे स्वभावही काहीसा खेळकर असतो. ते जिथे जातील तिथे नवनवे मित्र जोडतात. मात्र आपलेच म्हणणे रेटण्याच्या वृत्तीमुळे ते चार चौघात टीकेचे धनी बनतात. कोणी आपल्याबद्दल चांगले बोलले की वाईट याचा ते विचार करत नाहीत. आपल्याला योग्य वाटणाऱ्या गोष्टी ते बेधडकपणे करतात. हा आत्मविश्वासच त्यांना करिअर मध्ये पुढे नेतो.
मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम : धनु राशीचे चिन्ह पाहिल्यास व्यक्तीने हातात धनुष्य धरले आहे आणि तीच व्यक्ती कमरेच्या खालच्या भागातून घोडा बनलेली आहे. हे चिन्ह दर्शवते की मानसिक आणि शारीरिक श्रमाचे काम ते पूर्ण क्षमतेने करतात. धनु राशीच्या कुंडलीत कालपुरुष भाग्याच्या घरात येतो. म्हणूनच या लग्नाला भाग्यशाली लग्न म्हणतात. ही राशी मूळच्या चार अवस्था, पूर्वाषाढाची चार अवस्था आणि उत्तराषाढाची एक अवस्था मिळून बनलेली आहे. धनु राशीचा ग्रह बृहस्पति आहे.
धनु राशीचे लोक भाग्यवान असतात. त्यांना फक्त त्यांचे ध्येय निश्चित माहीत असावे लागते. ते स्पष्ट झाले की त्यांचा प्रवास सोपा होतो. हे लोक भाग्यवान यासाठी कारण त्यांना ध्येय पूर्ती करण्यात फारशा अडचणी येत नाहीत आणि आल्याच तर त्या बाजूला करायला ते मागे पुढे बघत नाहीत. या राशीच्या गुणानुसार राशीतच पुल्लिंगी छटा असल्याने या राशीच्या महिला जातकही पुरुषी ताठरतेने हुकूम गाजवतात.
धनु राशीच्या लोकांना अन्याय सहन होत नाही, मग तो स्वतःवर असो नाहीतर दुसऱ्यांवर! ते न्यायाच्या बाजूने, सत्याच्या बाजूने ठाम उभे राहतात. या लोकांमध्ये धैर्याची कमतरता नसते. योग्य ठिकाणी वाद घालण्यात त्यांना कमीपणा वाटत नाही आणि अनावश्यक ठिकाणी ते शब्दही खर्च करत नाहीत.
या लोकांचा अध्यात्माकडे जास्त कल असतो. धार्मिक कार्यात ते हिरीरीने पुढे येतात. सहभागी होतात. कार्यक्रमांचे आयोजन करतात. हाती घेतलेले काम पूर्णत्त्वास नेतात. लोकसंग्रह करण्याची वृत्ती अशा ठिकाणी कामी येते. त्यांना मित्रांचा, सहकाऱ्यांचा पाठींबा मिळतो.
हे लोक कोणत्याही गोष्टीचे फार टेन्शन घेत नाहीत. त्यामुळे ते अगदी खुशाल चेंडूसारखे आनंदात असतात. आपण भलं नि आपलं काम भलं असा यांचा पवित्रा असतो. हे लोक कोणाच्या मध्ये पडत नाहीत मात्र कोणी यांच्या वाटेत आडवे आले तर त्याला सोडतही नाहीत. मित्रांशी मित्र आणि शत्रूशी शत्रू अशी यांची थेट आणि स्पष्ट भूमिका असते. हे लोक आनंदी, समाधानी जीवन जगतात. आपल्या कुटुंबाचे, कुळाचे नाव मोठे होईल असे यश संपादन करतात. आपल्या क्षेत्रात उच्च पद भूषवतात.
धनु राशीचे लोक कफ प्रवृत्तीचे असतात. त्यांना स्किझोफ्रेनियासारखे आजार होण्याचा संभव असतो. यासोबतच फुफ्फुस आणि छातीचे आजार होण्याची शक्यताही जास्त असते. त्यांना खाण्याचीही खूप आवड असते. त्यामुळे वजनाचे संतुलन राहत नाही आणि लठ्ठपणामुळे अनेक आजार उद्भवतात. त्यामुळे या लोकांनी आहार, व्यायाम, योगाभ्यास या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. या लोकांनी सूर्याची उपासना केल्यास त्यांना शारीरिक आणि मानसिक खूप फायदा होऊ शकतो.