Maharashtra Election 2019 ; महिला बचत गटांना व्याजमुक्त कर्जपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 06:00 IST2019-10-07T06:00:00+5:302019-10-07T06:00:59+5:30
महिलांकरिता अनेक कायदे अस्तित्वात आले असले तरी ते फक्त कागदावरच आहेत. त्यांचे हक्कसुद्धा त्यांना मिळालेले नाही. यालाच स्त्री स्वातंत्र्य म्हणायचे का, असा सवाल ठाकूर यांनी महिला मेळाव्यातून उपस्थित केला. त्या म्हणाल्या, स्त्रीचे करिअर उंबरठ्याच्या आत बंदिस्त करणारा काळ केव्हाचाच संपला.

Maharashtra Election 2019 ; महिला बचत गटांना व्याजमुक्त कर्जपुरवठा
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : व्यवसाय व लघुउद्योग सुरू करण्यासाठी महिला बचत गटांना किमान ११ लाख रुपये व्याजमुक्त कर्जपुरवठा करण्यात यावा, अशी भूमिका आमदार यशोमती ठाकूर यांनी घेतली आहे. त्याकरिता त्यांनी भातकुली, अमरावती, मोर्शी आणि तिवसा तालुक्यांमध्ये अनेक महिला मेळावे आयोजित केले. बचत गट सक्षम व्हावेत, व्याजमुक्त कर्जपुरवठा मिळावा, यादृष्टीने आपण संघर्ष सुरू केल्याची माहिती यशोमती ठाकूर यांनी या मेळाव्यांमध्ये दिली.
महिलांकरिता अनेक कायदे अस्तित्वात आले असले तरी ते फक्त कागदावरच आहेत. त्यांचे हक्कसुद्धा त्यांना मिळालेले नाही. यालाच स्त्री स्वातंत्र्य म्हणायचे का, असा सवाल ठाकूर यांनी महिला मेळाव्यातून उपस्थित केला. त्या म्हणाल्या, स्त्रीचे करिअर उंबरठ्याच्या आत बंदिस्त करणारा काळ केव्हाचाच संपला. एका सावित्रीने स्त्रीशिक्षणासाठी प्रचंड सामाजिक मानहानी सोसली. त्यांच्यामुळे आज महिला शिकताहेत, प्रगती करताहेत. ही देण सावित्रीबाई फुले यांची आहे. क्षेत्र कोणतेही असले तरी महिलांना अनेक वेळा त्रासच सहन करावा लागतो. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वावरताना मलासुद्धा बरेच काही सोसावे लागले. पण मी हरले नाही, थांबले नाही. म्हणून आज इथे पोहोचले आहे. तुम्हीसुद्धा हार मानू नका. संकटे आली म्हणून थांबू नका. सकारात्मक विचार करा आणि अशीच वाटचाल पुढे राहू द्या, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या. स्त्रिया आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या, तर त्यांची प्रगतीची वाटचाल प्रशस्त होईल. त्यादृष्टीने महिला बचतगटांना किमान ११ लाख रुपये व्याजमुक्त कर्जपुरवठा शासनाने करावा. त्यासाठीच महिला मेळाव्याचा हा जागर सुरू केला आहे. जोपर्यंत या लढ्याला यश येणार नाही, तोपर्यंत मी थांबणार नाही, अशी भूमिका त्यांनी महिला मेळाव्यांमध्ये मांडली.