शिवसेनेला नवसंजीवनी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 14:39 IST2019-10-26T14:39:49+5:302019-10-26T14:39:54+5:30
या मतदारसंघात प्रथमच खाते उघडल्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेला नवसंजीवनी मिळाल्याचे बोलल्या जात आहे.

शिवसेनेला नवसंजीवनी!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: महायुतीच्या जागा वाटपात शिवसेनेच्या वाट्याला जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघापैकी एकमेव बाळापूर मतदारसंघ आल्यामुळे पक्षात चांगलीच धुसफूस निर्माण झाली होती. पक्षांतर्गत विरोधकांवर कुरघोडी करीत बाळापूर मतदारसंघातून दंड थोपटणारे शिवसेनेचे उमेदवार तथा जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांना तरुणांची मिळालेली साथ आणि बुथ प्रमुखांच्या ‘मॅनेजमेंट’ने विजयश्री मिळवून दिल्याचे चित्र आहे. या मतदारसंघात प्रथमच खाते उघडल्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेला नवसंजीवनी मिळाल्याचे बोलल्या जात आहे.
सप्टेंबर २०१६ मध्ये शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी जिल्ह्याची सूत्रे हाती घेताच जिल्हा कार्यकारिणीत मोठे फेरबदल केले होते.
माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांचे ‘प्रमोशन’ करीत त्यांच्याकडे सहायक संपर्क प्रमुख पदाची धुरा सोपवून जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी नितीन देशमुख यांच्याकडे सोपविली. उण्यापुऱ्या तीन वर्षांच्या कालावधीत जिल्हाप्रमुख देशमुख यांनी संपूर्ण जिल्ह्यात पक्षबांधणी करण्यासोबतच बाळापूर विधानसभा मतदारसंघातील तटबंदी मजबूत करण्याकडे लक्ष दिले. २००९ मध्ये अकोट मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार संजय गावंडे विजयी झाले होते. २०१४ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले.
त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वाट्याला कोणता मतदारसंघ येणार आणि उमेदवाराचा विजय होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
पक्षाची कोंडी करण्याचा प्रयत्न
महायुतीच्या जागा वाटपात जिल्ह्यातून एकमेव बाळापूर मतदारसंघ निश्चित होणार असल्याचे दिसताच पक्षातील काही इच्छुकांनी जिल्हाप्रमुखांसह पक्षाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. अकोट मतदारसंघासाठी ‘फिल्डिंग’ लावणाºया इच्छुकांनी पक्षांतर्गत विरोधकांना छुप्या पद्धतीने खतपाणी घातल्याचा परिणाम दिसून आला. पक्षाने ग्रामीण भागातील कोणताही एक आणि शहरी भागातील अकोला पूर्व किंवा अकोला पश्चिम मतदारसंघाची मागणी करावी, असा रेटा इच्छुकांनी लावून धरीत बंडाचे निशाण फडकावले होते.
विरोधकांना चारी मुंड्या चीत
२०१६ मध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी भाजपने जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यावेळी अवघ्या तीन मतांनी देशमुख यांचा पराभव झाला. यामध्ये शिवसेनेच्या दोन सदस्यांचा समावेश होता. तेव्हापासूनच पक्षांतर्गत विरोधकांचा बंदोबस्त करण्याचे काम सुरू झाले. पक्षापासून फारकत घेणारे तसेच स्वपक्षीयांसह भाजपमधील कट्टर विरोधकांचा सामना करीत नितीन देशमुख निवडणुकीला सामोरे गेले. निकालाअंती या सर्वांना चारी मुंड्या चीत केल्याचे समोर आले.