Preparations for counting; The verdict tomorrow, the voter's enthusiasm intensifies | मतमोजणीची तयारी सुरू; उद्या फैसला, मतदारांची उत्कंठा शिगेला
मतमोजणीची तयारी सुरू; उद्या फैसला, मतदारांची उत्कंठा शिगेला

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांत २१ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले असून, मतमोजणी गुरुवार, २४ आॅक्टोबर रोजी होणार आहे. त्यानुषंगाने प्रशासनामार्फत मतमोजणीची तयारी सुरू करण्यात आली आहे. मतमोजणीत पाचही मतदारसंघांतील उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार असल्याने, त्यामध्ये कोण-कोण बाजी मारणार, याबाबत मतदारांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले असून, पाचही मतदारसंघांतील ६८ उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये सीलबंद झाले आहे. २४ आॅक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून, सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. त्यानुषंगाने पाचही विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमार्फत मतमोजणीची तयारी सुरू करण्यात आली आहे. मतमोजणीत जाहीर होणाऱ्या निवडणूक निकालात पाचही मतदारसंघांतील उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. त्यामुळे मतमोजणीत मतदारांचा कौल कोणा-कोणाला मिळतो आणि कोणत्या मतदारसंघात कोण-कोण बाजी मारणार, याबाबत पाचही मतदारसंघांतील मतदारांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे.


पाच मतदारसंघांतील ७० टेबलवर मतमोजणी!

  •  प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी १४ टेबलवर होणार आहे.
  • त्यानुसार जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांतील मतमोजणी एकूण ७० टेबलवर होणार आहे.


मतमोजणीसाठी४२५कर्मचाऱ्यांची नेमणूक!

मतमोजणीसाठी प्रत्येक मतदारसंघात मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक व मतमोजणी सूक्ष्म निरीक्षकांसह इतर आनुषंगिक कामांसाठी ८५ कर्मचारी राहणार आहेत. याप्रमाणे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांच्या मतमोजणीसाठी ४२५ कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली आहे.


Web Title: Preparations for counting; The verdict tomorrow, the voter's enthusiasm intensifies
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.