The economy has been shaken by BJP's erroneous economic policies - Asaduddin Owaisi | भाजपच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे अर्थव्यवस्था डबघाईस - असदुद्दीन ओवेसी

भाजपच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे अर्थव्यवस्था डबघाईस - असदुद्दीन ओवेसी

अकोला: भाजप सरकारच्या काळात उद्योग, कारखाने बुडाले. महागाई, बेरोजगारी वाढली आहे. शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. जात-धर्माच्या आधारे निवडणूक लढविली जात आहे. कलम ३७0 रद्द केल्याचा मुद्याचा वापर करून जनतेची दिशाभूल केली जात आहे. भाजप-सेना भुलथापा देणारे आहे. त्यामुळे जनतेने त्यांना थारा देऊ नये. भाजप सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे, असा हल्लाबोल आॅल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अ‍ॅड. असदुद्दीन ओवेसी यांनी शनिवारी बाळापुरात चढविला.
बाळापूर विधानसभा मतदारसंघात शनिवारी दुपारी बाळापुरातील बसस्थानकामागील मैदानात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. 
खासदार अ‍ॅड. असदुद्दीन ओवेसी म्हणाले, भाजप-शिवसेना जाती, धर्माच्या आधारावर समाजा-समाजांमध्ये तेढ निर्माण करून फूट पाडत आहे. निवडणुका आल्या की, भाजप सरकार विकासाच्या मुद्यांवर बोलत नाही. हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण केली जाते. असे सांगत, खासदार ओवेसी यांनी, सध्या देशाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. जीएसटीमुळे व्यापार, उद्योगधंदे बुडत आहेत. बँका बंद पडत आहेत. महागाई वाढत आहे. भाजप सरकारला या देशाचा विकास नको आहे. त्यांना धर्माचा वापर करून जनतेमध्ये दहशत निर्माण करायची आहे. त्यामुळे जनतेने जात, धर्माचा विचार न करता, एमआयएमच्या उमेदवारांना साथ द्यावी. भाजप, शिवसेना, काँग्रेसच्या भुलथापांना जनतेने थारा देऊ नये, असे आवाहन बाळापुरातील जनतेला केले. (प्रतिनिधी)

 

Web Title: The economy has been shaken by BJP's erroneous economic policies - Asaduddin Owaisi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.