मुंबई : दरवर्षीच्या तुलनेत यंदा थोडी लवकरच आलेली थंडी उद्यापासून (बुधवार) कमी होणार आहे. त्याऐवजी आता हवामानात होणाऱ्या बदलामुळे २२ नोव्हेंबरनंतर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाची शक्यता आहे.
मुंबईच्या किमान तापमानाचा पाराही १८ वरून २२ अंश सेल्सिअसदरम्यान नोंदविण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतला गारवाही गेल्या काही दिवसांच्या तुलनेत कमी होण्याचा अंदाज आहे.
हिमालयात झालेली बर्फवृष्टी, उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारे थंड वारे; या कारणांमुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरातील किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्रात तर जळगावसह लगतच्या जिल्ह्यांत किमान तापमान ९ अंश सेल्सिअसवर येऊन ठेपले होते. तर मुंबईचा पाराही १८ पर्यंत घसरला होता.
हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमालयातून म्हणजे उत्तर भारतातून दक्षिणेकडे वाहणारे वारे थांबणार आहेत. त्याऐवजी दक्षिण-पूर्वेकडून वारे वाहण्यास सुरुवात होईल.
हवामान बदलाचा फटका
◼️ उत्तर-पूर्व मान्सूनचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे.
◼️ या बदलामुळे हवामानातील ओलावा वाढेल, ढग येतील.
◼️ परिणामी, नोव्हेंबरच्या उत्तरार्धात महामुंबई वगळून राज्यात पावसाची शक्यता आहे.
कुठे किती तापमान? (अंश सेल्सिअ)
जेऊर ८
अहिल्यानगर ९.५
नाशिक ९.६
जळगाव ९.८
मालेगाव १०
सातारा ११.९
नंदुरबार १२.१
छत्रपती संभाजीनगर १२.४
महाबळेश्वर १३.२
डहाणू १६.५
पालघर १५.९
मुंबई १८.९
ठाणे २१
अधिक वाचा: पीएम किसान योजेनेतून अडीच लाख शेतकऱ्यांना का वगळले? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
