एप्रिलमध्ये उष्णतेच्या तडाख्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले असतानाच वैशाख वणव्यात तीव्र उन्हामुळे तलावांतील पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने होत आहे.
महिनाभरात बीड जिल्ह्यातील तलावांमधील पाणीसाठा १६ टक्क्यांनी घसरला आहे. दररोज सरासरी दोन ते अडीच टक्क्यांनी पाणीसाठा कमी होत असल्याची चिंताजनक स्थिती आहे.
अल-निनोमुळे जूनच्या पावसाने दगा दिल्यास पावसाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाईच्या झळा तीव्र होण्याची शक्यता आहे. १ जून २०२५ पासून आतापर्यंत जिल्ह्यात ९७६.६० मिमी पाऊस नोंदला गेला. धरणांमध्येही समाधानकारक पाणीसाठा झाला. बीड जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान ६९९.३० मिमी इतके आहे.
एकूण १३९. ६५ टक्के पाऊस होऊनही पाणी पातळीत घट झाली आहे. विशेषतः एप्रिल आणि मेच्या पहिल्या आठवड्यात ४१ अंशापर्यंत पोहोचलेले तापमान आणि उष्ण वाऱ्यामुळे बाष्पीभवनातही वाढ झाली. परिणामी, तलावांतील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.
• ७ मे रोजी जिल्ह्यातील एक मोठा, १६ मध्यम व १२६ लघु अशा १४३ तलावांत ३०.४९ टक्के इतका पाणीसाठा असल्याचे प्रशासनाच्या अहवालात म्हटले आहे.
• बीड जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष पाणीसाठा ४१५.५०० दशलक्ष घनमीटर आहे. यापैकी १९७.१९२ दलघमी पाणी मृतसाठ्यात आहे. तर २१८.३०८ दलघमी पाणीसाठा उपयुक्त आहे. उपयुक्त साठ्याची टक्केवारी ३०.४९ आहे.
२० दिवसांत पाणीसाठा आणखी घटणार
उपलब्ध पाणीसाठा आणखी घटणार आहे, तर सर्व तालुक्यांतील लघु तलाव कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. जूनमध्ये पावसाने ताण दिल्यास पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता असून, पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे.
अवैधरीत्या उपसा करणाऱ्यांना आवरा
• पाणीटंचाईचे संकट गळ्याशी येण्यापर्यंत वाट न पाहता लहान-मोठ्या तलाव परिसरातून होणारा पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
• अवैधरीत्या उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका प्रशासनाला दिलेल्या आदेशांचे अनुपालन अपेक्षित असून, पाणी वाचविता येऊ शकते.
... असा घसरला जलसाठा
२ एप्रिल रोजी - ४७%
२९ एप्रिल रोजी - ३८%
७ मे रोजी - ३०.४९%
...अशी आहे स्थिती
• बीड जिल्ह्यातील १४३ प्रकल्पांपैकी ७५ ते १०० टक्के पाणीसाठा एकाही प्रकल्पात नाही.
• एक मध्यम व २ लघु तलावांत ५० ३ ते ७५ टक्के पाणीसाठा आहे.
• १ मोठा प्रकल्प (माजलगाव), ८ मध्यम व ३१ लघु तलाव २५ ते ३ ५० टक्के भरलेले आहेत.
• ४ मध्यम व ५५ लघु तलावांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी आहे.
• ३ मध्यम व ३७ तलाव जोत्याखाली आहेत. तर १ प्रकल्प कोरडा आहे.
हेही वाचा : तुम्हालाही नैसर्गिक गरजेपेक्षा अधिक घाम येतो का? काळजी घ्या; गंभीर आजरांचा धोका अधिक
