कोल्हापूर जिल्ह्याच्या आजरा तालुक्यात शुक्रवार रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसामुळे साळगाव बंधारा सहाव्यांदा पाण्याखाली गेला आहे. तालुक्यातील सर्व प्रकल्प जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच भरले आहेत. त्यामुळे सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पावसाने आजरा शहरातील रस्ते खड्डे व चिखलमय झाले आहेत. रस्त्यावर सर्वत्र पाणीचपाणी झाले आहे. पावसाचे पाणी सोयाबीन, भुईमूग, मिरची पिकांमध्ये साचून राहिल्याने पिकांना धोका निर्माण झाला आहे. अद्यापही ४० टक्के क्षेत्रावरील भात रोप लागण झालेली नाही. पावसाने साळगाव बंधाऱ्यावर दोन महिन्यांत सहाव्यांदा पाणी आले आहे.
साळगाव बंधाऱ्याला पर्यायी पूल
बांधण्यासाठी ३ कोटींचा निधी मंजूर होऊनही बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पेरणोली, देवकांडगाव, कोरीवडे, हरपवडे, साळगाव, विनायकवाडी या गावांना सोहाळे मार्गे प्रवास करावा लागत आहे. दुपारनंतर पावसाचा जोर थोडा कमी झाला. मात्र, हिरण्यकेशी व चित्री नदी धोक्याच्या पातळीबाहेरून वाहत आहेत.
धरणातून पडणारे पाणी (आकडेवारी क्युसेकमध्ये)
सर्फनाला - ५११
चित्री - ३४१
आंबेओहोळ - ३०४
एरंडोल व धनगरवाडी - १८०